Mon, May 20, 2019 22:49होमपेज › Belgaon › मराठी अस्मिता करा प्रकट

मराठी अस्मिता करा प्रकट

Published On: Mar 17 2018 1:15AM | Last Updated: Mar 16 2018 11:19PMबेळगाव : प्रतिनिधी

सीमाप्रश्नाचा लढा मराठी अस्मितेसाठी सुरू आहे.  मायबोलीच्या राज्यात आपण समाविष्ट व्हावे, ह्या ध्येयाने प्रेरित होऊन धगधगत आहे. त्यामुळे सीमालढ्याशी प्रतारणा करण्याचे पाप कोणीही करू नये. सीमाबांधवांची अस्मिता प्रकट करण्यासाठी शरद पवार यांच्या उपस्थितीत मेळावा होणार आहे. यावेळी सीमाबांधवांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून मेळावा यशस्वी करावा, असे आवाहन मध्यवर्ती म. ए. समिती सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी केले.

मंडोळी येथे तालुका म. ए. समितीच्यावतीने मंडोळी, सावगाव, हंगरगा विभागातील नागरिकांचा गुरुवारी मेळावा आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी धाकलू आंबेवाडीकर होते.

गावच्या वेशीतील अश्‍वारुढ शिवपुतळ्याचे पूजन मध्यवर्ती म. ए. समिती अध्यक्ष दीपक दळवी, प्रकाश मरगाळे यांनी केले. दीपप्रज्वलन माजी आ. मनोहर किणेकर, जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, माधुरी हेगडे, माजी  एपीएमसी अध्यक्ष मनोहर होसूरकर यांनी केले. 

यावेळी 31 मार्च रोजी बेळगाव येथे होणारी सभा 20 रोजी जुने बेळगाव येथे होणारा मेळावा यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला.अष्टेकर म्हणाले, सीमालढ्यासाठी महाराष्ट्राने दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. महाराष्ट्राच्या  प्रत्येक नेत्यांनी आपले योगदान दिलेले आहे. यामध्ये शरद पवार यांचे योगदान अधिक आहे. सीमाबांधवांशी संवाद साधण्यासाठी पवार येणार आहेत. सीमाबांधवांनी आपली ताकद दाखवून द्यावी.

कार्याध्यक्ष माजी आ. मनोहर किणेकर म्हणाले, सीमाप्रश्न अंतिम टप्प्यात आला आहे. यामुळे राजकीय पक्षाकडून मराठी माणसात फूट पाडण्याचे काम सुरू आहे. आमिषे दाखविण्यात येत आहेत. मात्र मराठी माणूस स्वाभिमानी आहे. तो कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाही. सीमाप्रश्नाचा सोक्षमोक्ष लागेपर्यंत मराठी माणसांनी एकनिष्ठ राहण्याची आवश्यकता आहे.

अध्यक्ष दीपक दळवी म्हणाले, शरद पवारांच्या सभेत अडथळे आणण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. मात्र, सर्व अडचणींवर मात करून सभा यशस्वी करण्याची धमक मराठी माणसांत आहे. हे दाखविण्याची वेळ आली आहे. प्रेमा मोरे,  कृष्णा हुंदरे, वनिता पाटील, धोंडिबा सुतार यांनी मनोगत व्यक्‍त केले. कार्यक्रमाला ता. पं. सदस्या नीरा काकतकर, आर. आय. पाटील, रामचंद्र मोदगेकर, एपीएसी सदस्य आर. के. पाटील, महेश जुवेकर, दिलीप कांबळे, भागोजी पाटील, युवा आघाडी अध्यक्ष अ‍ॅड. शाम पाटील, उपाध्यक्ष दत्ता उघाडे, आप्पाजी मुचंडीकर आदीसह म. ए. समितीचे नेते उपस्थित होते.
प्रास्ताविक के. बी. फगरे यांनी केले, तर आभार माजी ता. पं. सदस्य यल्लाप्पा कणबरकर यांनी मानले.

Tags : belgaon, belgaon news, border dispute, Sharad Pawar, public meeting,