Mon, Mar 25, 2019 04:57
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › दोन वकिलांवर खुनी हल्ल्याचा गुन्हा

दोन वकिलांवर खुनी हल्ल्याचा गुन्हा

Published On: Jun 26 2018 1:14AM | Last Updated: Jun 26 2018 12:11AMबेळगाव :  प्रतिनिधी

पोलिसांनी दोन वकिलांवर खुनी हल्ल्याचा गुन्हा नोंद केल्याच्या निषेधार्थ सोमवारी बेळगाव बार असोसिएशनने न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार घातला व वकिलावरील अन्याय दूर करण्यासाठी राज्याचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्‍वर यांना उद्देशून अतिरिक्त जिल्हाधिकारी बुद्धाप्पा यांना निवेदन सादर केले. 

येथील अ‍ॅड. अरुण सी. खत्री व जे. सी. कुसनूर हे बेळगाव बार असोसिएशनचे सदस्य असून ते बेळगावमधील न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करतात. दिवाणी न्यायालयामध्ये व आणखी एक फौजदारी खटला न्यायालयामध्ये चालू असताना 6 मार्च रोजी या दोन्ही वकिलांनी 8 सहकार्‍यांसह आपल्या घरी येऊन आपल्यावर खटल्यामध्ये समझोता करण्यासाठी आणण्याचा प्रयत्न केला. त्याशिवाय सदर तक्रारदार महिलेला ठार मारण्याची धमकी देऊन घराबाहेर काढले, अशी तक्रार खडेबाजार पोलिसांनी त्या दोन्ही वकिलांवर नोंद केल्याचा आरोप करण्यात आला आहे.वकिलांच्या या बहिष्कारामुळे सोमवारी संपूर्ण न्यायालयीन कामकाज ठप्प झाले होते. त्यानंतर वकिलांनी मोर्चाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाऊन अतिरिक्त जिल्हाधिकारी बुद्धाप्पा यांच्याकडे राज्याचे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्‍वर यांना उद्देशून निवेदन सादर केले.

अ‍ॅड. अरुण खत्री व अ‍ॅड जी. सी. कुसनूर हे निरपराधी असून ते कोणतेही बेकायदेशीर काम करणारे वकील नाहीत. त्यांना विनाकारण या तक्रारीमध्ये गोवण्यात आले आहे.  या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोन्ही वकिलांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. गुन्हा नोंद केलेल्या पोलिस निरीक्षकाविरुद्धही कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदर निवेदन बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. एस. एस. किवडसण्णावर यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी बुद्धाप्पा यांना पदाधिकारी व वकिलांच्या उपस्थितीत सादर केले.