Tue, Feb 18, 2020 05:37होमपेज › Belgaon › देशाचे चौकीदार कुठे गेले?

देशाचे चौकीदार कुठे गेले?

Published On: Feb 27 2018 2:05AM | Last Updated: Feb 27 2018 12:00AMरामदुर्ग : वार्ताहर 

लोकसभा निवडणुकांपूर्वी देशातील जनतेला दिलेले आश्‍वासन पंतप्रधान मोदी विसरले आहेत. देशाचा रखवालदार म्हणून काम करणार असल्याचे सांगणार्‍यांनी हिर्‍याचा व्यापारी नीरव मोदी बँकांना 22 हजार कोटींची फसवणूक करून फरार झाला, त्यावेळी कोठे गेले होते,  असा प्रश्‍न राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी उपस्थित करून केंद्र सरकारवर शरसंधान साधले. 

रामदुर्ग विधानसभा मतदारसंघातील गोडची येथे आयोजित करण्यात आलेल्या जनाशीर्वाद सभेला उद्देशून ते बोलत होते. राज्यातील काँग्रेस सरकारने राबविलेल्या महत्त्वाकांक्षी योजना हेच कर्नाटकातील काँग्रेस सरकारचे यश आहे, असे त्यांनी सांगितले. 

राहुल म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी राज्यातील काँग्रेस सरकारला भ्रष्ट सरकार संबोधले आहे; मात्र राज्यातील जनहित व भ्रष्टाचारमुक्‍त सरकार पाहिल्यास पंतप्रधान मोदींना बोलण्याचा कोणताच अधिकार नाही. आपल्याच पक्षाच्या भ्रष्ट आणि जेलची वारी केलेल्या मंत्र्यांच्या व्यासपीठावर काँग्रेस पक्षावर टीका करण्याचा अधिकार मोदींना नाही. गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी लोकपाल आणण्यासंदर्भात चालढकल केली. आता केंद्रात सत्तेवर येऊन चार वर्षांचा कालावधी उलटला, तरी लोकपाल विधेयकाचे घोंगडे भिजत पडले आहे. उद्योजकांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज माफ करणार्‍या मोदी सरकारने दुष्काळामुळे हैराण झालेल्या शेतकर्‍यांच्या कर्जाची मात्र दखल घेतली नाही. राज्यातील काँग्रेस सरकारने मात्र शेतकर्‍यांची परिस्थिती पाहून सहकारी संघांमधील शेतकर्‍यांचे 8 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे. 

यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, मल्लिकार्जुन खर्गे, केपीसीसी अध्यक्ष डॉ. जी. परमेश्‍वर, कार्याध्यक्ष एस. आर. पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा लक्ष्मी हेब्बाळकर, मंत्री डी. के. शिवकुमार, के. एच. मुनीयप्पा, एआयसीसी सचिव माणिक ठाकूर, मार्गारेट अल्वा, जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी, आ. सतीश जारकीहोळी, अशोक पट्टण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 

शेतकर्‍यांकडून राहुल गांधींना काळी निशाणे

जिल्ह्याच्या दौर्‍यावर आलेल्या काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी या भागातील महत्त्वाकांक्षी म्हादई योजनेवर कोणतीच प्रतिक्रिया व्यक्‍त केली नाही. या सुरू असलेल्या वादावर एकदाही अवाक्षर काढले नसल्याने संतप्त शेतकरी नेत्यांनी राहुल गांधी यांना काळे ध्वज दाखवून आक्रोश व्यक्‍त केला. रॅलीदरम्यान शेतकर्‍यांनी निदर्शने करून निषेध व्यक्‍त केला. दरम्यान, 45 पेक्षा अधिक शेतकर्‍यांना यावेळी पोलिसांनी अटक केली. आयोजकांकडून शेतकर्‍यांना म्हादाई वादासंदर्भात राहुल गांधी आपला विचार व्यक्‍त करणार असल्याचे सांगण्यात आले होते; मात्र शेतकर्‍यांचा भ्रमनिरास झाल्याने शेतकरी नेत्यांनी त्यांचा तीव्र निषेध केला आहे.