Sun, Mar 24, 2019 08:50होमपेज › Belgaon › राजकीय कुबेरांच्या मालमत्तेत मोठी वाढ 

राजकीय कुबेरांच्या मालमत्तेत मोठी वाढ 

Published On: Apr 21 2018 12:59AM | Last Updated: Apr 20 2018 10:54PMबेळगाव : प्रतिनिधी  

विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार्‍या राजकीय कुबेरांना आपल्या मालमत्तेचा तपशील निवडणूक आयोगाला द्यावा लागतो. यानुसार अनेक राजकीय मातब्बरांच्या मालमत्तेत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. अनेकांची मालमत्ता चारपटीने वाढली आहे. काँग्रेस निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष ऊर्जामंत्री डी. के. शिवकुमार यांची मालमत्ता 840 कोटी, होसकोटीचे आमदार आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचे जवळचे असणारे एम.टी. बी नागराज यांची मालमत्ता 1000 कोटी आहे. कनकपूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार शिवकुमार यांनी 2013 मध्ये झालेल्या निवडणुकीदरम्यान उमेदवारी अर्जामध्ये कुटुंबाची मालमत्ता 251 कोटीची असल्याचे नमूद केले होते. यावेळी ही मालमत्ता 840 कोटीची झाली आहे. 2013 मध्ये त्यांचे कौटुंबिक कर्ज 105 कोटीचे होते. आता सदर कर्ज 258 कोटी आहे. त्यांची वैयक्तिक मालमत्ता 651 कोटी आहे. त्यांच्या कुटुंबाकडे सहा वर्षापूर्वी 6 कि. सोने होते.आता 1 कि. सोने, 321 ग्रॅम हिरे आहेत. 

एम.टी.बी. नागराज यांची वैयक्तिक मालमत्ता 708 कोटी, पत्नीच्या नावे 306 कोटी असल्याचे प्रमाणपत्र सादर केले आहे. 2013 मध्ये यांची मालमत्ता 470 कोटी  होती. आता 520 कोटींनी वाढ झाली आहे. कृषी भूमीव्यतिरिक्त इतर जमिनी 370 कोटी इतकी मालमत्ता असून 233 कोटी कौटुंबिक कर्ज आहे. भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले विजयनगर मतदारसंघातील आमदार आनंदसिंग यांची मालमत्ता 125 कोटी, बळ्ळारी शहर जेडीएस उमेदवार महम्मद इकबाल होत्तूरी यांची मालमत्ता 149 कोटी इतकी आहे. भाजपचे राज्याध्यक्ष बी. एस. येडियुराप्पा यांची मालमत्ता 7 कोटीची आहे. विधानपरिषद विरोधी पक्ष नेते के. एस. ईश्‍वरप्पा यांची मालमत्ता 10.61 कोटी असल्याचे घोषणापत्रात नमूद केले आहे. 

खाणसम्राट असणारे आनंद सिंग हे 125 कोटीच्या मालमत्तेचे मालक आहेत. 2013 मध्ये घोषित केलेल्या घोषणापत्रात 104 कोटी त्यांची मालमत्ता होती. यामध्ये काहीप्रमाणात वाढ झाली आहे. त्यांच्याकडे रेंजरोव्हर, बीएमडब्लू यासह 18 ऐशोरामी कार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या नेत्यांमध्ये भाजपच्या उमेदवारांची मालमत्ता कमी असल्याचे दिसून आले आहे.बी. एस. येडियुराप्पा यांनी 7 कोटीची मालमत्ता असल्याचे घोषित केले आहे. 2013 मध्ये 5.96 कोटी, 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान 6.97 कोटी असल्याचे घोषित केले होते. के. एस. ईश्‍वरप्पा यांनी 10.61 कोटीची मालमत्ता असल्याचे घोषणापत्र नमूद केले आहे. गेल्यावेळी 7.28 कोटी मालमत्तेची घोषणा केली होती. तर 1.56 कोटी कर्ज असल्याचे नमूद केले होते.पद्मनाभ शहरातून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या आर. अशोक यांची 40 कोटीची मालमत्ता असल्याचे घोषित केले आहे. गेल्यावेळी त्यांनी 26 कोटी मालमत्ता असल्याचे घोषणापत्रात नमूद केले होते. 

Tags : Belgaum. big, increase, states, miserable, wealth