Thu, Aug 22, 2019 04:14होमपेज › Belgaon › जिल्ह्यात ९९७५ कोटी कृषी कर्ज

जिल्ह्यात ९९७५ कोटी कृषी कर्ज

Published On: Jul 05 2018 1:37AM | Last Updated: Jul 05 2018 12:09AMबेळगाव : प्रतिनिधी

खरीप हंगामातील पेरणीसाठी जिल्ह्यातील वेगवेगळ्या राष्ट्रीयकृत, सहकारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखामार्फत तब्बल 9975 कोटी रुपयाच्या कृषी पिकाचे वितरण झाले आहे. जिल्ह्यातील खरीप हंगामातील 25 टक्के पेरण्या अद्याप बाकी असताना बँकांनी शेतकर्‍यांना दिलासा दिला आहे.

वेगवेगळ्या कारणांनी नेहमी अडचणीत असणार्‍या शेतकर्‍यांना सरकारकडून दिलासा देण्याचा प्रयत्न केला जातो. यासाठी शून्य व्याजदराने तसेच सवलतीच्या व्याजदराने कर्जपुरवठा केला जातो. पेरणी हंगामाच्या पूर्वी यासाठी सहकारी संस्था, बँकाकडून कर्ज पुरवठा करण्याला पुढाकार घेण्यात आला आहे.

जिल्ह्यातील एकूण 37 बँकांच्या वेगवेगळ्या 660 शाखा, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 86 शाखा,  903 कृषी पतीन बँका यांच्या माध्यमातून कृषी कर्ज वितरण केले गेले आहे. शेतकर्‍यांना पेरणी आणि शेती यावर कृषी आणि पीक कर्ज वितरित करण्यात येते. शेतकर्‍याच्या मालकीच्या जमिनीवर कर्जाची रक्‍कम अवलंबून असते. त्यामध्ये बागायती पिकांना अधिक कर्ज मंजूर होते. राज्य आणि केंद्र सरकारकडून मंजूर असलेला निधी राष्ट्रीयकृत बँका, डीसीसी बँक, कृषी पतीन बँका यांच्या माध्यमातून कर्ज वितरण होते. 

मागील तीन वर्षापासून जिल्ह्यातील शेतकर्‍यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. अवर्षणामुळे खरीप आणि रब्बी हंगामातील पिके वाया गेली आहेत. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्याला दिलासा देण्यासाठी सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील मागील काँग्रेस सरकारने 50 हजारपर्यंतचे कृषी कर्ज माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. याचा लाभ अनेक शेतकर्‍यांना झाला. सध्या खरीप हंगामाला सुरूवात होउन दीड महिन्याचा कालावधी उलटला तरी समाधानकारक पावसाचे आगमन झालेले नाही. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. 

विधानसभा निवडणुकीत शेतकर्‍यांना कर्जमाफीचे आश्‍वासन देउन सत्तेवर आलेल्या निजद-काँग्रेस सरकारवर सध्या संपूर्ण कर्जमाफीसाठी दबाव वाढला आहे. त्यादृष्टीने मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी प्रयत्न चालविले आहेत. मात्र कर्जमाफीच्या निर्णयामुळे सरकारवर पडणारा आर्थिक बोजा अडचणीचा ठरणार आहे.