Sun, Nov 18, 2018 09:50होमपेज › Belgaon › ढोलगरवाडी सर्पशाळेत 96 पिलांचा जन्म

ढोलगरवाडी सर्पशाळेत 96 पिलांचा जन्म

Published On: Jul 09 2018 1:01AM | Last Updated: Jul 08 2018 11:54PMबेळगाव : प्रतिनिधी

ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथील सर्पशाळेत तीन घोणस जातीच्या मादीने 96 पिलांना जन्म दिला. सर्पोद्यान विभागप्रमुख प्रा. सदाशिव पाटील यांनी याबाबतचा शासकीय पंचनामा पूर्ण करून पिलांना तिलारी जंगलात सोडण्याचे नियोजन केले आहे. 

‘सेंट्रल झू अ‍ॅथॉरिटी, दिल्ली व वन्यजीव संरक्षक विभाग महाराष्ट्र राज्य नागपूर’ यांची मान्यताप्राप्त संस्था गेली 50 वर्षे सर्प संरक्षण, जीवांच्या रक्षणाचे कार्य करीत आहेत. येथे विविध दुर्मीळ जातीचे साप आहेत. सापांचे वर्षभर जतन करण्यात येते. सापांच्या नैसर्गिक कृतींचा अभ्यासही करण्यात येतो. या ठिकाणी देशभरातील अभ्यासक भेट देऊन माहिती घेत असतात.  सद्यस्थितीत जतन करण्यात आलेल्या विषारी जातीच्या तीन घोणसांनी प्रत्येकी 30 ते 40 अशा 96 पिलांना जन्म दिला आहे. चंदगड वनखात्याचे अधिकारी व सर्पमित्र प्रा. सदाशिव पाटील, यांच्या उपस्थितीत  पिलांचा पंचनामा करून तिलारी जंगलात सोडण्यात येणार आहे. जतन केलेल्या फुरसे, चापडी, मणियार, घोणस या जाती थेट पिलांना जन्म देतात तर नाग, धामण तस्कर, पानसाप या जाती अंड्याद्वारे जन्म देतात, असे प्रा. पाटील यांनी सांगितले. 

शेतकर्‍यांनी बाळगावी सावधानता

सापांच्या विविध जातींचा प्रजनन काळ पावसाळ्यातच असतो. अनेक शेतकर्‍यांना दंश होण्याच्या घटनांत वाढ होत असते. घोणस जात सुस्त असून सेकंदाच्या नवव्या भागात सावजावर हल्ला करतो. हिमोटॉक्सिक  हे विष असून याचा थेट परिणाम रक्तावर होतो. रक्‍ताच्या गुठळ्या होऊन चावा घेतलेला भाग काळा पडतो. हा साप एकावेळी किमान 30 ते 40 पिलांना जन्म देतो.