Wed, May 22, 2019 14:23होमपेज › Belgaon › जिल्ह्यात तीन वर्षांत 959 महिला बेपत्ता

जिल्ह्यात तीन वर्षांत 959 महिला बेपत्ता

Published On: Mar 08 2018 12:00AM | Last Updated: Mar 07 2018 9:57PMबेळगाव : प्रतिनिधी

जिल्ह्यामध्ये गेल्या तीन वर्षात 959 महिला बेपत्ता झाल्याची प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. यापैकी 272 महिला अद्यापही बेपत्ताच आहेत. यावर गंभीर विचार करून निर्णय घेण्याची गरज आहे. मानव तस्करी संदर्भात झालेल्या कार्यक्रमा दरम्यान या विषयावर मोठी चर्चा करण्यात आली आहे. आज महिलादिनी देशभर विविध विषयांवर चर्चा होणार आहेत.परंतु महिला सुरक्षित आहेत का, हा संशोधनाचा मुद्दा आहे.

कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात येत असली तरी जिल्ह्यामध्ये मानव तस्करीची प्रकरणे नोंद होत आहेत. यामुळे कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये बेळगाव जिल्ह्यात 959 महिला बेपत्ता झाल्याची प्रकरणे दाखल झाली आहेत. यामध्ये 18 वर्षाखालील 163 युवतींची प्रकरणे आहेत. 796 प्रकरणेही 18 पेक्षा अधिक वय झालेल्या महिलांची आहेत. यामध्ये मानव तस्करीला अनेकजण बळी पडल्याचे समोर आले आहे. 

सामाजिक संघटनांकडून जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या प्रकरणांची दखल घेऊन शोध मोहीम घेण्यात आली. या माध्यमातून 678 महिलांचा शोध घेण्यात आला. उर्वरित 272 महिलांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिस प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. यामध्ये युवतींचाही समावेश आहे. 
जिल्ह्यातील ग्रामीण भागात मानव तस्करी प्रकरणांची अधिक प्रमाणात नोंद होत आहे. यामध्ये प्रामुख्याने अथणी, खानापूर, हुक्केरी, चिकोडी, सौंदत्ती आणि गोकाक या तालुक्यांमध्ये बेपत्ता प्रकरणे अधिक आहेत. 

वेश्या वाटिका आणि औद्योगिक वसाहतींमधील कमी असलेल्या कामगारांच्या जागी त्यांची नेमणूक करण्यात येणार असल्याचे समोर आले आहे. यामुळेच मानव तस्करी होत असल्याचे पुढे आले आहे. विदेशातून शरीराच्या विविध अवयवांंची मागणी वाढली आहे. अश्‍लील चित्रपटांमध्ये मुलांचा उपयोग करण्याच्या उद्देशाने मानव तस्करी वाढली आहे. राज्यामध्ये बेळगावसह उत्तर कर्नाटकातील जिल्ह्यामध्ये मानव तस्करीची प्रकरणे अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. येथून तस्करी करण्यात आलेल्यांची मुंबई, बंगळूर, गोवा यासह विदेशामध्येही विक्री होत आहे. मानवी चोरटी तस्करी रोखण्यासाठी जनजागृती करणार्‍या व राष्ट्रपातळीवर काम करणार्‍या जस्टीस आणि केअर संस्थेच्या अहवालातून हे निदर्शनास आले आहे.