Fri, Mar 22, 2019 05:31
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › शाळांना आरटीईसाठी हवेत ९३ कोटी

शाळांना आरटीईसाठी हवेत ९३ कोटी

Published On: Jun 15 2018 1:04AM | Last Updated: Jun 14 2018 9:07PMबेळगाव : प्रतिनिधी

राज्यातील 11 हजार 918 शाळेमध्ये आरटीईअंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. सुमारे पाच लाख विद्यार्थी खासगी शाळेत धडे गिरवत आहेत. त्यासाठी 93 कोटी 47 लाख 5 हजाराचा निधी खासगी शाळांना द्यावा लागणार आहे. त्यापैकी 50 कोटींचा निधी 34 जिल्ह्यांना मंजूर झाला आहे.

एकीकडे सरकारी शाळा बंद पडत असताना गरीब कुटुंबांना शिक्षण हक्क कायद्यांतर्गत खासगी शाळेत प्रवेश देण्याची सोय केली. तथापि, हाच निधी सरकारी शाळांचा दर्जा सुधारणे, शिक्षक भरती करणे यावर खर्च केला असता तर कदाचित सरकारी शाळा बंद पडण्याची वेळ आली नसती, असे पालकांचे म्हणणे आहे.

बेळगाव जिल्ह्यात 298 खासगी शाळेत आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. त्यासाठी 3 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे बेळगावपेक्षा चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात आरटीईअंतर्गत प्रवेश देणार्‍या शाळांची संख्या जास्त आहे. बेळगाव जिल्ह्यात 298, तर चिक्कोडी जिल्ह्यात ती 481 आहे. सर्वांत कमी शाळा शिरसी शैक्षणिक जिल्ह्यात असून त्यांची संख्या केवळ 45 आहे.

त्यांच्यासाठी आरटीई अंतर्गत निधी 1 कोटी मंजूर झाला आहे. राज्यात 34 शैक्षणिक जिल्ह्यांपैकी सर्वाधिक शाळा बंगळूरमध्ये आहेत. बंगळूर दक्षिण 1571, बंगळूर उत्तर 1102 खासगी शाळेत आरटीई अंतर्गत प्रवेश देण्यात आला आहे. बंगळूर दक्षिण जिल्ह्यातील शाळासाठी 10 कोटी 41 लाख 75 हजारचा निधी दिला आहे. तर बंगळूर उत्तर जिल्ह्यातील शाळासाठी 10 कोटी 75 लाखाचा निधी खासगी शाळेला मिळाला आहे. गरीब कुटुंबातील मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी खासगी शाळेत आरटीई अंतर्गत दाखल करण्यापेक्षा सरकारी शाळेचा दर्जा सुधारण्यावर भर द्यावा.