Thu, May 23, 2019 04:44होमपेज › Belgaon › खानापूर मतदारसंघात अपक्षांना 9 हजार मते

खानापूर मतदारसंघात अपक्षांना 9 हजार मते

Published On: May 22 2018 1:16AM | Last Updated: May 21 2018 7:52PMबेळगाव : प्रतिनिधी

खानापूर मतदारसंघात 2008 मध्ये अपक्ष उमेदवारांची मते तब्बल 53,528 च्या घरात होती. त्यामुळे राष्ट्रीय पक्षाला मजल मारता आली. 2018 मध्ये सुध्दा अपक्ष उमेदवारांची मते 8,823  च्या घरात पोहचल्याने बंडखोरांना फटका बसला. याचे आत्मचिंतन सर्वच पक्षानी करणे गरजेचे आहे.विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारांनी घेतलेली मते निर्णायक असतात. त्याच्यावरच विजयी उमेदवार निवडून येत असतो. त्यामुळे राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार आपल्या मतदारसंघात जास्तीतजास्त अपक्ष उमेदवार कसे निवडणूक रिंगणात आणता येतील, यावर जास्त भर देत असतात. 

खानापूर मतदार संघात 2008 मध्ये 22 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यापैकी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवारांची संख्या तीन होती. 2008 मध्ये अपक्षांची मते 53 हजार 528 च्या घरात होती. त्यावेळी भाजपचे उमेदवार प्रल्हाद रेमाणी 36 हजार 288 मते घेऊन विजयी झाले होते. काँग्रेसचे उमेदवार  रफिक खानापुरी  24 हजार 634 मते घेत दुसर्‍या क्रमांकावर होते. त्यावेळेला नोटा हा पर्याय नव्हता.   म. ए. समितीमध्ये दुफळी माजल्याने तब्बल 11 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. प्रत्येकजण मीच म. ए. समितीचा अधिकृत उमेदवार असा प्रचार करत होते. 

दहा वर्षांनी पुन्हा खानापूर मतदार संघात अपक्ष उमेदवारांची मते निर्णायक ठरली आहेत. 2018 मध्ये सहा अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यांना पडलेल्या मतांची बेरीज केल्यास 7 हजार 159 इतकी होते. त्यामध्ये नोटाला पडलेल्या 1664  मतांची बेरीज केल्यास 8 हजार 823 इतकी होते. ही मते अधिकृत उमेदवाराला पडली असती तर 2018 च्या निकालचे चित्र वेगळे दिसले असते. काँग्रेसमध्ये दुफळी माजून नासीर बागवान यांनी निजदमध्ये प्रवेश केला. डॉ. अंजली निंबाळकर यांना मिळालेली 36,649 व नासीर बागवान यांच्या 27,272 मतांची बेरीज 63,921 होते. म. ए. समितीचे अरविंद पाटील यांची 26,613 मते व विलास बेळगावकर यांना मिळालेली 17,851 मतांची बेरीज 44,464 होते.  भाजपचे विठ्ठल हलगेकर यांनी घेतलेली 31,516 मते व जोतिबा रेमाणी यांची 5,898 मते यांची बेरीज 37 हजार 414 होते. अपक्ष  8,823 मते वरील उमेदवारांमध्ये विभागली असती तर निवडणुकीचे चित्र वेगळे असते.