Thu, Jun 27, 2019 18:36होमपेज › Belgaon › रेल्वेच्या धडकेत 9 गायी जागीच ठार 

रेल्वेच्या धडकेत 9 गायी जागीच ठार 

Published On: May 23 2018 1:07AM | Last Updated: May 23 2018 12:17AMबेळगाव  : प्रतिनिधी

चरावयास सोडलेल्या भटक्या गायींना रेल्वेची धडक बसून 9  गायी जागीच ठार झाल्याची घटना मुचंडीजवळ मंगळवारी पहाटे घडली. अपघातात तीन जनावरे गंभीर जखमी आहेत. रेल्वेची जोरदार धडक बसल्याने जनावरांचे अवशेष विखुरले होते.  हृदयद्रावक घटनेमुळे शेतकर्‍यांतून हळहळ व्यक्‍त करण्यात येत आहे.सोमवारी दिवसभर चरून रात्री मुचंडीजवळ रेल्वे रुळावर या गायी बसल्या होत्या. मंगळवारी पहाटे हा अपघात घडला आहे. त्यात 7 गायी 2 वासरांसह एकूण 9 जनावरांचा मृत्यू झाला. जनावरांच्या मालकांचा रात्री उशिरापर्यंत पत्ता लागू शकलेला नाही. याबाबत रेल्वे पोलिस तपास करीत आहे. मालवाहू रेल्वेच्या धडकेत  हा अपघात घडल्याचा अंदाज असे रेल्वे पोलिसांकडून व्यक्‍त करण्यात येत आहे. 

डोंगरमाथ्यावर असणार्‍या हुल्ल्यानूर, बुड्रयानूर, सोन्‍नट्टी, बसवनकोळ्ळ, कारावी आदी गावांमध्ये मोठ्या प्रमणात गायींचे संगोपन केले जाते, पण ही जनावरे डोेंगरात मोकाट चरावयास सोडली जातात.  मात्र, उन्हाळ्यात डोंगर भागात जनावरांना चारा उपलब्ध होत नसल्याने ही जनावरे हिरव्या चार्‍यासाठी बळ्ळारी नाला परिसरात ठाण मांडून असतात. मुचंडी गावातील शेतकरी सकाळच्या प्रहरी शेतवडीत गेलेे असता ही घटना निदर्शनास आली. माहिती लागलीच पोलिसांना देण्यात आली. घटना समजताच कलखांब, अष्टे, चंदगड गावातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. 

*दफन

हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांना अपघाताची माहिती मिळताच जनावरांच्या अत्यंसंस्काराची व्यवस्था केली. श्रीराम सेना, बजरंगदल कार्यकर्त्यांनी पुढाकार घेउन जेसीबीच्या सहाय्याने खड्डा खणून दफनविधी पार पाडला. परशराम पाखरे, डॉ.गजानन वरपे, लक्ष्मण बुड्री, सिध्दाप्पा वरपे, राहूल पाटील, राहूल आवाणे, सचीन तासीलदार, प्रदिप जक्‍काणे, सुरज आंबोजी, सुरज जक्‍काणे, संतोष चौगुले, आकाश पाखरे, आदी कार्यकर्त्यांनी मदत केली.मोकाट जनावरांमुळे या परिसरातील शेकर्‍यांना त्रास सहन करावा लागतोे. त्यामुळे बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे. 

रेल्वे पोलिस उशिरा

अपघात पहाटे घडला असल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरविण्यात आली होती. मात्र, अनभिज्ञ असलेल्या रेल्वे पोलिसांनी सायंकाळी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. रेल्वे पोलिस निरीक्षक बाळप्पा वालीकर व सहकार्‍यांनी भेट दिली.