बेळगाव : प्रतिनिधी
मुस्लिम धर्मियांत रमजान हा सण पवित्र मानला जातो. या सणादरम्यान रोजे सुरू असल्याने बाजारपेठेत खाद्यपदार्थांना मोठी मागणी आहे. त्यातही विशेष म्हणजे मुस्लिम बांधवांकडून खजूराला मोठी मागणी आहे. येथील बाजारपेठेत किमान 10 ते 12 देशातून विविध प्रकारातील खजूर उपलब्ध आहेत.
रमजान सणाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी हमखास खरेदी करण्यात येणारे फळ म्हणजे खजूर. सध्या बाजारात खजूर 100 रुपयांपासून 8 हजार रुपये प्रति किलो उपलब्ध आहेत. रमजान या सणात दररोज काटेकोरपणे उपवास केला जातो. दिवसभर उपवास करून सायंकाळी पौष्टिक फळांसह आहार घेतला जातो. खजूरातून मिळणारी विविध जीवनसत्वे, खजिने, फायबर, लोह, पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नीज, कॉपर यांचा शरिराला फायदा होतो. या महिन्यामध्ये मुस्लिम बांधव कडक उपवास करतात. धार्मिक प्रथेनुसार खजूर खाऊनच उपवास सोडण्याची हजारो वर्षांची परंपरा आहे. सायंकाळी सामूहिक नमाज पठण करून उपवास सोडला जातो. यानिमित्ताने बाजारपेठेत शिरखुर्म्यासाठी शेवया, सुखा मेवा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.
अजवा खजूर 8 हजार रुपये किलो
येथील बाजारपेठेत शंभर रुपयांपासून 8 हजार रुपये किलो असणारे खूजर उपलब्ध आहेत. देशविदेशातील खजूरांच्या दर्जावरून किंमत आकारली जात आहे. युनिक्यू जातीचा खजूर 820 रु. किलो, कलमी(सौदी) जातीचा खजूर 880 रु. किलो आहे. सर्वसामान्यांना परवडेल अशा 70 रुपये प्रतिकिलो दरापासून सर्वात महाग अजवा खजूराचा किलोचा दर तब्बल 8 हजार रुपये आहे.