होमपेज › Belgaon › खानापुरात 77 टक्के मतदान

खानापुरात 77 टक्के मतदान

Published On: Sep 01 2018 1:45AM | Last Updated: Aug 31 2018 11:13PM खानापूर : प्रतिनिधी

खानापूर नगरपंचायतीच्या 20 जागांसाठी शुक्रवारी शांततेत मतदान पार पडले. चुरशीची स्पर्धा, जंगी प्रचार आणि मातब्बरांच्या लढती यामुळे मतांची टक्केवारी वाढली. 14 हजार 60 मतदारांपैकी 10 हजार 818 जणांनी मतदान केले. 76. 94 इतक्या मतदानाची नोंद झाली. 

सोमवार 3 रोजी सकाळी 8 वा. पासून सर्वोदय विद्यालयात मतमोजणीची सुरुवात होणार आहे. वॉर्ड  7 मध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद झाली. येथे 88.04 टक्के मतदान झाले. येथील 510 पैकी 449 मतदारांनी हक्क बजाविला. वॉर्ड 8 मध्ये सर्वात कमी 65. 80 टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली. 500 पैकी 329 नागरिकांंनी मतदान केले.

सकाळी 7 वा. पासून मतदानास सुरुवात होताच उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी मतदानाचा हक्क बजाविला. यानंतर रिक्षा, दुचाकी, कारमधून वयोवृद्ध व महिलांना केंद्रापर्यंत आणून मतदान करुन घेण्यावर भर देण्यात आला. सर्वच केंद्रांवर दुपारी एकपर्यंत मतदारांची गर्दी पाहावयास मिळाली. पावसाने दिवसभर उघडीप दिल्यामुळे नागरिक उत्स्फूर्तपणे मतदानासाठी घराबाहेर पडले.

केंद्राबाहेर उमेदवार कार्यकर्त्यांसह मतदारांना आपल्यालाच मतदान करण्याची विनवणी करताना दिसत होते. ताराराणी हायस्कूलमध्ये दोन केंद्रांची सोय करण्यात आली होती. शिवाय स्टेशन रोडवरील कन्नड शाळा, केंचापूर गल्लीतील मिलाग्रीज चर्च शाळा, मठ गल्लीतील स्वामी विवेकानंद हायस्कूल, चिरमुरकर गल्लीतील मराठी शाळा येथे प्रत्येकी दोन केंद्रे होती. परिणामी मतदार व कार्यकर्त्यांची गर्दी दिसून आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलिस बंदोबस्त होता. 20 जागांसाठी 80 उमेदवारांचे भवितव्य मतयंत्रात बंद झाले.

खानापूर न. पं. साठी झालेल्या मतदान प्रक्रियेत प्रत्येक वॉर्डातून कडवी झुंज पाहावयास मिळाली. आठवडाभरापासून  मतदारांची विशेष काळजी घेणार्‍या उमेदवारांनी मतदानाच्या शेवटच्या घटकेपर्यंत त्यांना खूश ठेवण्याचा प्रयत्न केला. पावसानेही उघडीप दिल्याने दुपारी 2 पर्यंत 50 टक्क्याहून अधिक मतदान झाले. काही ठिकाणी हमरीतुमरीच्या घटना वगळाता मतदान शांततेत झाले. वृध्द आणि महिलांना मतदान केंद्रापर्यंत पोहचविण्यासाठी प्रत्येक वॉर्डात चारचाकी आणि रिक्षा होत्या. परगावी राहणार्‍या मतदारांसाठी येण्या-जाण्याच्या खर्चाबरोबर जेवणाचीही सोय करण्यात आली होती. 

ताराराणी हायस्कूल, कन्नड शाळा, स्वामी विवेकानंद स्कूल, ऊर्दू  शाळा व सरकारी इमारतींमध्ये अशा 20 केंद्रांवर मतदान सोय होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी केंद्रे, धार्मिक स्थळे व अतिसंवेदनशील केंद्रांवर अधिक सुरक्षा देण्यात आली होती.