होमपेज › Belgaon › त्यांची 70 वर्षांची वीज प्रतीक्षा संपुष्टात

त्यांची 70 वर्षांची वीज प्रतीक्षा संपुष्टात

Published On: Jan 10 2018 1:56AM | Last Updated: Jan 09 2018 9:25PM

बुकमार्क करा

खानापूर : वासुदेव चौगुले

मानवी अधिवासासाठी अत्यावश्यक असणार्‍या कसल्याच सुविधा नाहीत. ना वीज, ना रस्ता, ना शाळा ना मोबाईलचे नेटवर्क. अशा परिस्थितीत जगणार्‍या तालुक्याच्या अतिटोकावर वसलेल्या व्हळदा ग्रामस्थांच्या जीवनात अखेर उजेडाची पहाट उजाडली. ही पहाट आणली आहे सोलार दिव्यांच्या लखलखाटाने. स्वातंत्र्यानंतर तब्बल 70 वर्षांनी येथील नागरिकांना सरकारी म्हणता येईल अशा एखाद्या योजनेचा लाभ झाला आहे. यामुळे सारे ग्रामस्थ हरखून गेले असून त्यांनी दिवाळीचाच आनंद साजरा केला.

वन्यप्राण्यांचा 24 तास वावर आणि चोहीकडे घनदाट जंगल यामुळे व्हळदावासीयांना दैनंदिन जीवन जगत असताना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. कृष्णापूर या गावापासून 5 कि. मी. वर व्हळदा हे अवघ्या आठ ते दहा घरांचे गाव वसले आहे. तिसेक लोकांचे हे गाव सर्वार्थाने गोवा राज्यावर अवलंबून आहे. म्हादई नदीपात्रामुळे या गावचा खानापूरशी विशेष संपर्क येत नाही. तालुक्याच्या नकाशाव्यतिरिक्त कुठेच या गावचे अस्तित्व नाही. गाव  खानापूर तालुक्यात असले तरी क्‍लिष्ट भौगोलिक रचनेमुळे येथे जाण्यासाठी गोव्यातील वाळपईवरून जावे लागते.

इतक्या हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणार्‍या व्हळदावासियांनी वीजपुरवठ्याची आशाच सोडली होती. मात्र पंडित दीनदयाळ ग्रामीण विद्युतीकरण योजनेंतर्गत थेट गावात वीज खांबाची उभारणी करून सौर ऊर्जेद्वारे गाव प्रकाशमान करण्याची योजना आखण्यात आली. त्यानुसार गावालगतच्या खुल्या जागेत सौरघटकाची निर्मिती करण्यात आली. सभोवती लोखंडी कुंपण उभारून ऊर्जानिर्मिती करण्यात आली.  यासाठी  खासगी कंपनीच्या सहाय्याने रात्रभर वीजपुरवठा सुरळीत राहील, इतक्या क्षमतेच्या ऊर्जानिर्मितीचे युनिट उभारण्यात आले आहे. योजनेत पूर्णपणे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या योजनेमुळे सायंकाळी 7 पासून सकाळी 6 पर्यंत गावातील पथदीप पेटणार आहेत. प्रत्येक घरात वीज जोडणी देण्यात आली असून सकाळी 7 पासून दिवसभर तसेच मध्यरात्री अडीचपर्यंत सोलार विद्युतपुरवठा सुरू राहणार आहे.

पाच वर्षांच्या दुरुस्ती व देखभालीची जबाबदारी संबंधित कंत्राटदार कंपनीवर सोपविण्यात आली आहे. या योजनेच्या यशस्वितेसाठी हेस्कॉमचे कार्यकारी व्यवस्थापक एस. पी. सक्करी, तांत्रिक निर्देशक राजाप्पा, टी. बी. मजगी, प्रवीणकुमार चिक्काडे, एस. ए. अळकुंटे, सी. एस. रंगनाथ, जे. एस. बंगेरा, एम. बी. पठाण आदींनी विशेष परिश्रम घेतले. गावच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच उजेडाचा सुखद अनुभव घ्यायला मिळाल्याने व्हळदावासियांच्या आनंदाला पारावार राहिला नाही.