होमपेज › Belgaon › जिल्ह्यात 7 हजार संशयित क्षयरूग्ण

जिल्ह्यात 7 हजार संशयित क्षयरूग्ण

Published On: Jul 19 2018 1:36AM | Last Updated: Jul 18 2018 8:17PMबेळगाव : प्रतिनिधी

जिल्ह्यात एकूण 7,294 संशयित क्षयरूग्ण आहेत. त्यापैकी 190 जणांना क्षयरोग झाल्याचे निदान करण्यात आले आहे. एकूण 1,598 जणांच्या पथकाने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती पुढे आली आहे. 2025 पर्यंत देश क्षयरोगमुक्‍त बनविण्यचे उद्दिष्ट केंद्र सरकारचे आहे. त्यानुसार जिल्ह्यामध्ये दोन आठवडे क्षयरोग झालेल्यांचा शोध घेण्यात आला. त्याकरिता आरोग्य सहायक, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी कार्यकर्त्यांसह 1,598 जणांनी घरोघरी जाऊन माहिती संग्रहित केली. संवेदनशील भागात निक्षय पोषण योजनेबाबतची माहिती देण्यात आली. क्षयरोगाची लक्षणे असणार्‍यांची जागीच तपासणी करण्यात आली. त्यांचे ‘कफ’ चाचणीसाठी पाठवून देण्यात आले. तात्काळ त्यांच्यावर उपचारही सुरू करण्यात आले.

जिल्ह्यातील सर्व सरकारी इस्पितळांमध्ये याकरिता मोफत क्ष-किरण तपासणी करण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. 1336 संशयित रूग्णांची क्ष किरण तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये क्षयरोग आढळून आलेल्यांची सिबिनॅट यंत्राने तपासणी करून रोगाचे निदान करण्यात आले आहे. गतवर्षी बेळगाव आणि चिकोडी इस्तिपळात हे यंत्र वापरण्यात आले होते. यंदा अथणी, गोकाक आणि सौंदत्तीतही याद्वारे निदान करण्यात आले. कोणत्याही प्रकारचा खोकला म्हणजे क्षयरोग नसतो. त्यामुळे अधिक तपासणी करूनच रोगाचे निदान करण्यात आले. या मोहिमेंतर्गत एकूण 10.56 लाख घरांना भेटी देऊन 10,41,977 जणांची तपासणी करण्यात आली. आणखी 333 संशयित रूग्णांची पुन्हा तपासणी करण्यात येणार आहे.

क्षयरूग्णांना पौष्टिक आहार मिळावा म्हणून केंद्र सरकारने ‘निक्षय पोषण’ योजना जारी केली आहे. याआदी रूग्णांना सरकारकडून मोफत उपचार दिले जाते होते. आता यंदापासून आर्थिक मदतही दिली जाणार आहे. 6 महिने, 8 महिने, 2 वर्षे किंवा रूग्ण बरा होईपर्यंत (रोगाच्या तीव्रतेनुसार) प्रत्येक रूग्णाला 500 रुपये देण्यात येणार आहेत. ही रक्‍कम संबंधिताच्या बँक खात्यावर जमा केली जाईल. या रकमेचा वापर पौष्टिक अन्न खरेदीसाठी करावा लागणार आहे. लवकरात लवकर आजार बरा व्हावा, हा यामागील उद्देश आहे. 

यंदाच्या एप्रिल महिन्यापासून निधान झालेल्या क्षयरूग्णांना योजनेचा लाभ मिळणार आहे. मोफत उपचाराबरोबरच त्यांना पैसेही मिळणार आहेत. खासगी डॉक्टर क्षयरूग्णांवर उपचार करत असतील तर त्याबाबतची माहिती सरकारला देणे सक्‍तीचे आहे. अशी माहिती देणार्‍या डॉक्टरांनाही 500 रुपये दिले जाणार आहेत. काही रूग्ण खासगी डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी जातात. एकदा किंवा दोनदा ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेतात. त्यानंतर ते पुन्हा डॉक्टरकडे जात नाहीत.