Tue, Apr 23, 2019 20:06होमपेज › Belgaon › ड्रेनेज स्वच्छ करताना आतापर्यंत ६५ कर्मचार्‍यांचा मृत्यू; मात्र कंत्राटदार मोकाट

ड्रेनेज स्वच्छ करताना आतापर्यंत ६५ कर्मचार्‍यांचा मृत्यू; मात्र कंत्राटदार मोकाट

Published On: Dec 02 2017 12:40AM | Last Updated: Dec 01 2017 8:58PM

बुकमार्क करा

विजापूर : प्रतिनिधी

राज्यातील शहरांमधून तुंबलेली ड्रेनेज स्वच्छ करताना आतापर्यंत 65 सफाई कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला आहे. हे बेकायदेशीर काम लावणार्‍या एकाही कंत्राटदाराला शिक्षा ठोठाविण्यात आली नसल्याबद्दल कर्नाटक राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष एम. आर. व्यंकटेश यांनी खंत व्यक्त केली आहे. 

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ड्रेनेज स्वच्छ करताना मृत्यू झालेल्या कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांना मदत दिली जाते. परंतु ही मदत खूपच कमी आहे. यासंदर्भात आयोगामार्फत लवकरच बंगळूरमध्ये पोलिस अधिकार्‍यांची बैठक घेऊन त्यामागील कारणांचा शोध घेण्यात येणार आहे. 

सरकारने राज्यातील सर्व सफाई कर्मचार्‍यांना ओळखपत्र देण्यासाठी व आयोगाकडे नाव नोंदणी करण्यासाठी 20 लाख रु. निधी मंजूर केला आहे. राज्यामध्ये अंदाजे 12.5 लाखपेक्षा जास्त सफाई कर्मचार्‍यांची संख्या आहे. केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करणार्‍या सफाई कर्मचार्‍यांची नावे आयोगाने नोंद केली आहेत. या नोंदणीमुळे सफाई कर्मचार्‍यांना लाभ मिळणार आहेत. सर्व्हेचे हे कामकाज  जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. सफाई कर्मचार्‍यांकडून शहर स्वच्छतेचे कामकाज चांगले केल्याबद्दल व्यंकटेश यांनी त्यांचे कौतुक केले आहे. परंतु कंत्राटदार सफाई कर्मचार्‍यांना वेळेत वेतन देत नाहीत. त्याबद्दल त्यांनी असमाधान व्यक्त केले.  

ज्या कंत्राटदारांनी वेतन दिले नाही. त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. सर्व कंत्राटदारांनी आपले रेकॉर्ड एक आठवड्याचा कालावधीत आपल्याला सादर करावे, अशी सूचनाही त्यांनी केली आहे. सफाई कर्मचार्‍यांसाठी स्वतंत्र आयोगाची स्थापना करणारे कर्नाटक हे पहिले राज्य आहे. त्यांना किमान वेतन 17 हजार रुपये देण्याचा निर्णय सरकारने यापूर्वीच घेतला आहे. हे किमान वेतन  इतर राज्यांच्या तुलनेने सर्वात जास्त आहे, असेही व्यंकटेश यांनी सांगितले.