Fri, Apr 19, 2019 07:59होमपेज › Belgaon › बळ्ळारी नाल्यात 60 फूट अतिक्रमण

बळ्ळारी नाल्यात 60 फूट अतिक्रमण

Published On: Jul 04 2018 2:12AM | Last Updated: Jul 03 2018 11:50PMबेळगाव : प्रतिनिधी

बळ्ळारी नाल्यात 60 फूट अतिक्रमण झाल्याचे स्पष्ट झाले असून, आठवडाभरात अतिक्रमण हटवण्याची कारवाई होण्याची शक्यता आहे. सोमवारी अधिकार्‍यांनी पुन्हा बळ्ळारी नाल्याचा सर्वे केल्यानंतर अतिक्रमण झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र अहवाल दोन दिवसांनंतर सादर होण्याची शक्यता आहे.

नकाशाप्रमाणे बळ्ळारी नाल्याची पाहणी तसेच मोजणी दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत केली गेली. हलगा जुन्या पुलाजवळ बळ्ळारी नाल्यावर सुमारे 60 फूट अतिक्रमण झाल्याची प्राथमिक माहिती घटनास्थली अधिकार्‍यांनी ‘पुढारी’ला दिली

जुन्या पुलाजवळ बळ्ळारी नाल्यावर झालेल्या अतिक्रमणाविरोधात पंतप्रधानांपासून लोकायुक्तांपर्यंत पाठपुरावा करण्यात आला.  तरीही कारवाई झाली नव्हती. मात्र पहिल्या पावसातच बळ्ळारी नाल्यामुळे शिवारात पाणी फुगल्याने या नाल्याच्या बाजूने असलेल्या 14 गावांच्या शेतीचा प्रश्‍न ऐरणीवर आला. त्यामुळे सोमवारी जिल्हाधिकार्‍यांनी अधिकारी वर्गाला धारेवर धरत  नव्याने बळ्ळारी नाल्याचा सर्व्हे करुन अतिक्रमण हटविण्याची सूचना बैठकीत केली. त्यानुसार  मंगळवारपासून अधिकारीवर्ग कामाला लागला. प्रांताधिकारी कविता योगपन्नवर व तहसीलदार मंजुळा नाईक यांच्या देखरेखीखाली सर्वे सुरू आहे. 

अतिक्रमण हटले नाही तर पाच गावांची शिवारे पाण्याखाली जाणार आहेत. ‘पुढारी’ने पावसाळ्याआधीपासूनच अतिक्रमणाबाबत इशारा दिला होता. त्यानंतर हे प्रकरण तहसीलदार, भूमापन, जि. पं, महानगरपालिका असा प्रवास करुन आता पुन्हा तहसीलदारकडे आले आहे. 

अतिक्रमणामुळेे पारंपरिक गाडे मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे हलगा, जुनेबेळगाव, वडगाव, शहापूर व अनगोळ भागातील शेतकर्‍यांना रहदारीचा मार्ग बंद झाला आहे. पाण्याचा निचरा न झाल्याने शिवारात पाणी घुसून पिके उगविण्यापूर्वी कुजून गेली आहेत.