Wed, Jul 24, 2019 15:01होमपेज › Belgaon › आयटी छाप्यानंतरही ५ जणांना आमदारकी

आयटी छाप्यानंतरही ५ जणांना आमदारकी

Published On: May 17 2018 1:28AM | Last Updated: May 17 2018 12:43AMबंगळूर : प्रतिनिधी

निवडणुकीची धामधूम सुरू असताना प्राप्‍तीकर खात्याने छापे घालून तपास केलेल्या उमेदवारांपैकी पाचजण विजयी झाले तर सहाजण पराभूत झाले. मतदानाच्या काही दिवस अगोदर रिंगणातील उमेदवारांच्या निकटवर्तीयांच्या निवास आणि कार्यालयांवर प्राप्‍तीकर अधिकार्‍यांनी छापे घालून कागदपत्रांची तपासणी केली. बेकायदा मालमत्ता असल्याबाबत संबंधितांची चौकशीही केली. काहीजणांच्या निवासात कोट्यवधीच्या भेटवस्तू सापडल्या. त्या मतदारांना वाटण्यासाठी आणण्यात आल्याचा संशय व्यक्‍त करण्यात आला. मात्र, साक्षीदार आणि योग्य पुराव्यांअभावी उमेदवारांच्या निवासावर छापे घालणे शक्य झाले नाही.

प्राप्‍तीकर कारवाई करण्यात आलेले आनेकल येथील काँग्रेस उमेदवार बी. शिवण्णा विजयी झाले. हल्याळमधून विजयी झालेले काँग्रेस आर. व्ही. देशपांडे यांच्या निकटवर्तीयांकडून प्राप्‍तीकर अधिकार्‍यांनी बेहिशोबी 1.22 कोटी रुपये जप्‍त केले होते. विजनयनगर मतदारसंघातील विजयी काँग्रेस उमेदवार आनंदसिंग  यांच्या बदामीतील कृष्णा हेरिटेज रिसॉर्टवर छाप्यावेळी एक डायरी सापडली. त्यातील नोंदीनुसार अनेकांना कोट्यवधी रुपये देण्यात आल्याचे दिसून आले.

गदगमधील काँग्रेस उमेदवार एच. के. पाटील यांचे निकटवर्तीय गुरण्णा बळगानूर यांच्यासह काहीजणांच्या निवासावर छापे घालण्यात आले होते. त्या ठिकाणी 19 लाखांची रक्‍कम जप्‍त करण्यात आली होती. अरभावीतील विजयी भाजप उमेदवार भालचंद्र जारकीहोळी यांच्या निकटवर्तीय संतोष सोनवाळकर यांच्या निवासात अधिकार्‍यांनी तपास केला होता. 

पराभूत उमेदवार

बंटवाळचे पराभूत काँग्रेस उमेदवार रमानाथ राय यांचे निकटवर्तीय संजव पुजारी आणि सुधाकर शेेट्टी यांच्या निवासावर छापे घालून प्राप्‍तीकर अधिकार्‍यांनी बेहिशोबी मालमत्तेबाबत चौकशी केली होती. बदामीतील भाजप उमेदवार बी. श्रीरामुलू यांनी वास्तव्य केलेल्या हॉटेलवर छापा घालून तपास करण्यात आला होता. त्यांना या मतदारसंघातून पराभूत व्हावे लागले तरी मोळकाल्मुरूतून ते विजयी झाले. चित्रदुर्ग मतदारसंघात पराभूत झालेले निजद उमेदवार के.सी. नरेंद्र यांच्या निकटवर्तीयांच्या निवासावर मतदानाच्या काही दिवस आधी छापा घालण्यात आला होता. नागमंगलातील काँग्रेस उमेदवार चेलुवरायस्वामी, हुबळीतील अपक्ष उमेदवार गोपाल कुलकर्णी, शिर्शीतील काँग्रेस उमेदवार भीमण्णा नायक, टी. नरसीपूमधील काँग्रेस उमेदवार एच. सी. महादेवप्पा यांच्या निकटवर्तीयांच्या निवासांवर अधिकार्‍यांनी छापे घातले होते.