Wed, Mar 20, 2019 23:13होमपेज › Belgaon › भीषण अपघातात 5 ठार

भीषण अपघातात 5 ठार

Published On: Jun 26 2018 1:14AM | Last Updated: Jun 26 2018 12:29AMनिपाणी : प्रतिनिधी

भरधाव पिकअपचा टायर फुटल्यानेे विरुद्ध दिशेने येत असलेल्या आयशरला जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात पाच जण ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला. ही दुर्घटना पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर निपाणी येथील महात्मा गांधी सरकारी रुग्णालयासमोरील भुयारी मार्गावर सोमवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास  घडली. मृतांमध्ये कोल्हापुरातील तीन तरुणांचा समावेश आहे.
फयूम सलीम बागवान (वय 23), नदीम इसाक बागवान (24, रा. यशोदा कॉलनी, लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर), शब्बीर करीम सय्यद (25, रा. त्रिमूर्ती कॉलनी, कळंबा, कोल्हापूर), राजमहंमद अब्दुलगफार बागवान (37, रा. बागवान गल्ली, निपाणी), रमेश बसाप्पा दोडमनी (40, रा. कोळगुड, जि. हावेरी) अशी मृतांची नावे आहेत. आयशर वाहनाचा क्‍लीनर आनंद रामाप्पा लमाणी (35) हा गंभीर जखमी असून, त्याच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या अपघातात दोन्ही वाहनांच्या पुढील बाजूचा चक्‍काचूर झाला आहे. आयशर चालक आणि पिकअपमध्ये बसलेल्या राजमहंमद बागवान व रमेश या दोघांचे मृतदेह तब्बल तासभर वाहनातच अडकून होते. स्थानिक नागरिक व पूंजलॉईडच्या भरारी पथकाच्या कर्मचार्‍यांनी मोठ्या शर्थीने प्रयत्न करीत क्रेनच्या साहाय्याने दोन्ही वाहने बाजूला करून दोन्ही मृतदेह बाहेर काढले. घटनास्थळी रक्‍तामांसाचा सडा पडल्याचे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते.

कोल्हापूर येथील अब्दुल अत्तार यांच्या मालकीच्या पिकअप वाहनातून फयूम बागवान हा घटप्रभाहून कोल्हापूरला भाजीपाला घेऊन जात होता. त्याच्यासोबत नदीम, शब्बीर व राज तिघे जण होते. वाहन भुयारी मार्गावर आल्यावर वेगाने जात असलेल्या या वाहनाचा चालकाकडील बाजूचा पुढील टायर फुटला. त्यामुळे चालक फयूम याचा ताबा सुटल्याने वाहन दुभाजकावर आदळले आणि विरुद्ध दिशेने पुण्याहून बंगळूरकडे जाणार्‍या आयशरला धडकले. या जोरदार धडकेत दोन्ही वाहनांच्या पुढील बाजूचा चक्‍काचूर झाला.

या अपघातात आयशर चालक रमेश याच्यासह नदीम, राजमहंमद व शब्बीर या चौघांचा जागीच मृत्यू झाला. आयशरचा क्‍लीनर आनंद व पिकअप वाहनाचा चालक फयूम हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच 108 वाहन चालकासह पूंजलॉईडच्या भरारी पथकाचे निरीक्षक सचिन हुक्केरी, शरीफ करोली यांनी कर्मचार्‍यांसह धाव घेतली. जखमींना तातडीने उपचासाठी हलविण्यात आले. फयूम याची प्रकृती गंभीर असल्याने त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारसाठी कोल्हापूर सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले; पण वाटेतच त्याचाही मृत्यू झाला.घटनास्थळी सीपीआय किशोर भरणी, शहर पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार एम. जी. निलाखे, हवालदार एस. एस. चिकोडी, बसवराज न्हावी, बसवेश्‍वर चौक पोलिस ठाण्याचे फौजदार रायगौंडा जानर, खडकलाटचे सी. बी. बागेवाडी यांनी घटनास्थळाकडे धाव घेत माहिती घेतली.

मृत निपाणी, कोल्हापूर येथील भाजीपाला विके्रेते असल्याचे  समजताच आंबा मार्केटमधील घाऊक व्यापार्‍यांसह सभापती अनिस मुल्‍ला, नगरसेवक दत्ता जोत्रे, जुबेर बागवान, शेरू बडेघर, राज पठाण, माजी नगरसेवक अल्लाबक्ष बागवान यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. यावेळी  घटनास्थळासह रुग्णालय आवारात नागरिकांनी मोठी गर्दी केली. मृतांच्या निपाणी व कोल्हापुरातील नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. मृत फयूम व नदीम हे दोघेही अविवाहित होते.

फयूम याच्या पश्‍चात आई, आजोबा, आजी, दोन भाऊ, तर नदीमच्या पश्‍चात आई, बहीण, भाऊ असा परिवार आहे. शब्बीर यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, मुलगी तर राजमहंमद यांच्या पश्‍चात आई, पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे.दुपारी चारही मृतदेहांची उत्तरीय तपासणी महात्मा गांधी सरकारी रुग्णालयात केल्यावर ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. अपघाताबाबत आयशर वाहनाचा क्‍लीनर आनंद यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मोठी दुर्घटना टळली

अपघातापूर्वी आयशर व इचलकरंजी-होसपेट बस मागोमाग एक जात होती. अपघातस्थळापासून काही अंतरावर थांबा असल्याने चालकाने प्रवासी घेण्यासाठी बस थांबवली. त्यामुळे आयशर वाहन पुढे गेले. भुयारी मार्गावर वाहन गेल्यावर मागून बस आली. याचवेळी पिकअपचा टायर फुटल्याने दिशा बदलत ते आयशरवर आदळले. आयशर चालक आपले वाहन बाजूला घेताना मागून येणार्‍या बसला घासले. बस प्रवाशांना घेण्यासाठी थांबली नसती, तर आयशरची बसला जोराची धडक बसली असती किंवा विरुद्ध बाजूला दोन्हीही वाहने नसती, तर पिकअप वाहन भुयारी मार्गावरून खाली कोसळून मोठी दुर्घटना घडली असती.

‘त्या’ घटनेची आठवण

सन 2012 जूनमध्ये हरीनगर क्रॉसवर शिर्डीहून आंबेवली (सावंतवाडी) येथे परत येणार्‍या भाविकांच्या वाहनाला अशाप्रकारे टायर फुटल्याने अपघात घडला होता. त्या अपघातात 10 जणांना प्राण गमवावा लागला होता. या घटनेमुळे जुन्या घटनेची आठवण अनेकांना झाली.