Sat, Aug 24, 2019 21:26होमपेज › Belgaon › ‘परिवहन’ला अडिच वर्षात 43.64 कोटी तोटा

‘परिवहन’ला अडिच वर्षात 43.64 कोटी तोटा

Published On: Jun 28 2018 1:32AM | Last Updated: Jun 27 2018 8:21PMबेळगाव : सतीश जाधव 

वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळांतर्गत येणार्‍या बेळगाव विभागातील सात डेपोंना मागील अडिच वर्षात तोटाच सहन करावा लागला आहे. सततची इंधन दरवाढ, कर्मचार्‍यांचा पगार वाढ व प्रवाशांची कमतरता यामुळे परिवहनला मोठा तोटा झाला आहे. अडिच वर्षाच्या कालावधीत परिवहनला 43 कोटी 64 लाख 50 हजार रुपये तोटा सहन करावा लागला आहे.

राज्यात चार महामंडळे प्रवाशांच्या सेवेसाठी कार्यरत आहेत. यामध्ये बंगळूरचे बीएमटीसी, गुलबर्गा येथील एनकेआरटीसी, बंगळरू, मंगळूर आदी ठिकाणासाठी केएसआरटीसी  व हुबळी विभागासाठी वायव्य परिवहन महामंडळ सेवा देते. हुबळीमध्ये बेळगाव विभाग येतो. बेळगाव विभागात एकूण सात डेपो कार्यरत आहेत. यामध्ये शहरातील मध्यवर्ती बसस्थानक, सीबीटी, आरटीओसर्कलजवळील 3 नंबर डेपो, अ‍ॅटोनगर जवळील 4 नंबर डेपो, बैलहोंगल, रामदुर्ग व खानापूर हे डेपो येतात. 

या सात डेपोमधून  761 बस धावतात. तसेच शहर व परिसरात सुमारे 50 बस धावतात. केएसआरटीसाला मिळालेला महसूल व सरकारकडून येणारा फंड याची वजावट केल्यानंतर गेल्या अडिच वर्षात 43 कोटी 64 लाख 50 हजार रुपये तोटा झाला आहे.  मागील महिन्यात सुमारे पंधरा दिवस सतत इंधन वाढ झाली. मात्र, परिवहनने तिकीट दरात वाढ केली नाही. याचा पूर्ण भार महामंडळावर पडला आहे. 

2016-17 मध्ये 23 कोटी 24 लाख तोटा

परिवहनला 2016-17 साली 23 कोटी 24 लाख 22 हजार तोटा झाला. यावर्षी डिझेल सरासरी प्रतिलिटर 53 रुपये प्रतिलिटर होते. 2017-18 साली 16 कोटी 32 लाख 63 हजार रुपये तोटा झाला आहे. यावर्षी डिझेल सरासरी प्रतिलिटर 56 रुपये होते. 2018 -19 (मे) 4 कोटी 7 लाख 65 हजार रुपये तोटा झाला आहे. यावर्षी 65.23 प्रतिलिटर रुपये डिझेलचा दर आहे. एकंदरीत दरवर्षी डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. तसेच कामगरांच्या पगारातही वाढ झाली आहे. 

कर्नाटक परिवहन मंडळाची आठ राज्यातून सेवा

कर्नाटक राज्य परिवहन मंडळ आठ राज्यातून सेवा देते. यामध्ये कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, तमिळनाडू, आंध्रप्रदेश, केरळ, तेलंगणा, पद्दुचेरी या राज्यांचा समावेश आहे. मंडळाचे मुख्यालय बंगळूर येथे असून याची स्थापना 1961 साली झाली.