Fri, Jul 19, 2019 05:54होमपेज › Belgaon › 11 स्मशानभूमींसाठी 4 कोटीचा आराखडा

11 स्मशानभूमींसाठी 4 कोटीचा आराखडा

Published On: Jul 13 2018 12:47AM | Last Updated: Jul 12 2018 10:54PMबेळगाव : प्रतिनिधी

शहर परिसरातील अकरा स्मशानभूमींसाठी चार कोटीचा आराखडा तयार झाला असून तो राबविण्याची जबाबदारी मनपाचे साहाय्यक कार्यकारी अधिकारी व्ही. एस. हिरेमठ व महांतेश नरसन्नवर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. स्मशानभूमींच्या पाहणी दौर्‍यात उपमहापौरांसह नगरसेवक व साहाय्यक कार्यकारी अधिकार्‍यांनी भाग घेतला होता. स्मशानभूमी विकासाचा आराखडा तयार करण्याची माहिती देण्यात यावेळी मनपातर्फे देण्यात आली.

‘बसवनकुडची स्मशानभूमी विकासाच्या प्रतीक्षेत ,युवकच पुढाकार घेऊन करताहेत विकास’ या मथळ्याखाली ‘ पुढारी’मधून बातमी प्रसिध्द होताच बेळगावसह प्रभागातील स्मशानभूमींची पाहणी करण्यात आली. बेळगाव शहर, उपनगर व ग्रामीण भागातील  11 स्मशानभूमीसाठी 4 कोटीचा आराखडा तयार केला आहे. त्याप्रमाणे बेळगाव दक्षिणमधील सहा व उत्तरमधील पाच स्मशानभूमींचा सामावेश आहे. अलारवाड, आश्रय कॉलनी, बसवनकुडची, सदाशिवनगर, कणबर्गी, यमनापूर येथील स्मशानभूमींचा सामावेश आहे.

दक्षिण विभागातील सहा स्मशानभूमींचा विकास करण्याची जबाबदारी महापालिकेतील साहाय्यक कार्यकारी अधिकारी व्ही. एस. हिरेमठ व उत्तर विभागातील स्मशानभूमींचा विकास करण्याची जबाबदारी महांतेश नरसन्नवर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. ते लवकरच कामाचा प्रारंभ करणार आहेत.

उपमहापौर मधुश्री पुजारी यांनी बंगळूर येथे नगरविकासमंत्री रमेश जारकीहोळी यांची भेट घेऊन स्मशानभूमी विकासाकरिता निधी देण्याची मागणी केली होती. यानंतर जारकीहोळी यांनी तसे आश्वासन दिले होते. गेल्या आठवड्यात पाहणी दोरा आयोजित करण्यात आला होता. यात आमदार अ‍ॅड. अनिल बेनके, उपमहापौर पुजारी, नगरसेवक विनायक गुंजटकर, नागेश मंडोळकर, सुधा भातकांडे, माजी महापौर आप्पासाहेब पुजारी, व्ही. एस. हिरेमठ, महांतेश नरसन्नवर आदींनी दौर्‍यात भाग घेतला होता.

सुधारणा काय असेल?

अंत्यसंस्कार करण्यासाठी 3 बाय 4 चा चौथरा बांधण्यात येणार आहे. त्यावर दहनासाठी बिडापासून बनविण्यात आलेली शवदाहिनी बसविण्यात येणार आहे. पाण्याची सोय, चंदनाची झाडे, महादेवाचे मंदिर, संरक्षक भिंत, हायमास्ट दिवे, फुलांची बाग, बसण्यासाठी सिंमेटचे बाक, पावसाळ्यात शवदाहिनीवर  लोखंडी शेड, स्मशानभूमी आवारात फेव्हर्स बसविण्यात येणार आहेत.