Wed, Jun 26, 2019 23:38होमपेज › Belgaon › मुले 38  अन् शिक्षक एकच..तोही कन्नड!

मुले 38  अन् शिक्षक एकच..तोही कन्नड!

Published On: Jul 09 2018 1:01AM | Last Updated: Jul 08 2018 9:40PMजांबोटी : वार्ताहर

आधीच नागरी समस्यांनी ग्रासलेल्या आमगावच्या अडचणींमध्ये भरच पडत चालली आहे. एकीकडे केंद्र आणि राज्य सरकार  शैक्षणिक पाया मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील असताना असलेल्या शाळांकडे स्थानिक शिक्षण खात्याचे दुर्लक्ष होताना  दिसत आहे. अतिदुर्गम आणि घनदाट जंगलात वसलेल्या आमगावला अशीच परिस्थिती आहे. तब्बल 38 मुलांसाठी एकच शिक्षक तोही कन्नड असल्याने मुलांनी मराठी शिक्षणाचे धडे कसे गिरवावेत, असा प्रश्‍न पालकांना पडला आहे. अनेक वेळा मागणी करुनही तालुका शिक्षण खात्याचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला जात आहे.

चिखले ते आमगाव अशा आठ कि.मी.चा रस्त्याचा विकास भीमगड अभयारण्यामुळे रखडला आहे. यामुळे इतरही नागरी समस्या सुटणे कठीण झाले आहे. त्यात दिवसेंदिवस वाढणारे जंगली प्राण्यांचे हल्ले अशा अनेक भयानक परिस्थितीत दिवस कंठणार्‍या आमगाव गावकर्‍यांसमोर आता शैक्षणिक समस्येने डोके वर काढले आहे. दोन वर्षापासून येथील सातवीपर्यंत असलेल्या मराठी शाळेत शिक्षकच नाहीत. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. असे असताना गावकरी व शाळा सुधारणा समितीने अनेकवेळा मागणी करुनही तालुका शिक्षण खात्याचे दुर्लक्ष झाले आहे. गेल्या तीन तालुका शिक्षण अधिकार्‍यांकडे अनेकवेळा मागणी करुनही डोळेझाक होत आहे. मागच्या वर्षी दोनवेळा शाळकरी मुलांनाच बीईओ कार्यालयात आणले होते. तेव्हापासून आश्‍वासनांवर वेळ मारुन नेण्यात येत आहे.

शिक्षण खात्याच्या या आडमुठ्या धोरणामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या शाळेवर एका शिक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र ते अद्याप एकदाही शाळकडे आले नाहीत. असे असताना अधिकारी करतात तरी काय, असा सवाल ग्रामस्थांतून विचारला जात आहे. तालुका व स्थानिक लोकप्रतिनिधींसमोर ही समस्या गावकर्‍यांनी मांडली असून   त्याचेही याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या शाळेला वाली कोण, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.