Mon, Mar 25, 2019 17:27होमपेज › Belgaon › पीक विम्यासाठी 31 ची डेडलाईन

पीक विम्यासाठी 31 ची डेडलाईन

Published On: Jul 03 2018 1:51AM | Last Updated: Jul 02 2018 9:45PMनिपाणी : प्रतिनिधी

राज्य व केंद्र सरकारने शेतकर्‍यांना बहुपयोगी असलेल्या यंदाच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी 31 जुलैची डेडलाईन दिली आहे. गतवर्षी या योजनेचा निपाणी विभागातील जवळपास 25  पेक्षा अधिक शेतकर्‍यांनी लाभ घेतला आहे. यंदा कृषी खाते या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जोमाने कामाला लागले आहे.

शेतकर्‍यांनी या योजनेचा अधिक प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या 8 ते 10 वर्षापासून ही योजना कृषी स्तरावर कार्यरत करण्यात आली आहे. यंदा ही योजना सक्षमपणे राबवून त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी कृषी खात्यातर्फे फ्युचर जनरल इंडिया इन्शुरन्स कंपनीने जबाबदारी घेतली आहे.कृषी खाते ही योजना जास्तीतजास्त शेतकर्‍यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्नशील आहे.  केंद्र व राज्य सरकारने कृषी खात्यातर्फे बदलत्या  हवामानाचा अंदाज घेत शेतकर्‍यांना नुकसानीचा लाभ मिळण्यासाठी प्रभावी विमा योजना कार्यान्वित केली आहे.चार-पाच वर्षात पावसाचा अंदाज आलेला नाही. त्यामुळे शेतकरीवर्गाला पिकांसाठी लाखो रूपये खर्चूनही आर्थिक भुर्दंड सोसावा लागला आहे. या सर्वाचा विचार करून सरकारने शेती स्तरावर योजना कार्यान्वित केली आहे.

यंदाच्या विमा योजनेसाठी लाभ मिळणार्‍या कंपनीकडून पिकाचा पोत, जात व प्रमाणपत्रानुसार लाभ जाहीर केला आहे. यंदा पाणी व बिनपाणी क्षेत्रावरील सोयाबीनसाठी एक  एकरसाठी 288 रूपये अनामत रक्कम भरल्यास नुकसानभरपाई 14 हजार 400 रूपये तर पाण्यावरील भुईमूग, शेंग पिकासाठी एक एकर क्षेत्रासाठी 456 रूपये भरल्यास भरपाई 22 हजार 800 रूपये, पाण्यावरील भात पिकासाठी एकरी 688 रूपये भरल्यास 34 हजार 400 रूपये, बिनपाण्याच्या एक एकर क्षेत्रासाठी 432 रूपये भरल्यास 21 हजार 600 रूपये, मूग पिकाला पाणी व बिनपाणी क्षेत्रासाठी एकरी 232 रूपये भरल्यास 11 हजार 600, उडीद पिकासाठी एकरी 224 रूपये भरल्यास 11 हजार 200 रूपये नुकसानभरपाई मिळणार आहे.शेतकर्‍यांनी  सात-बारा उतारा, राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक, आधार कार्ड, सदर जमिनीतील पिकाची छायांकीत प्रत व ग्रामतलाठी यांचे पत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे. अर्ज बँकेत नसल्यास रयत केंद्रातून उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती रयत संपर्क केंद्राचे साहायक कृषी अधिकारी बी. एस. यादवाड यांनी दिली.