Wed, Jul 17, 2019 15:58होमपेज › Belgaon › बंगळूरच्या कंपनीकडून ३०० कोटींचा गंडा

बंगळूरच्या कंपनीकडून ३०० कोटींचा गंडा

Published On: Mar 11 2018 11:59PM | Last Updated: Mar 11 2018 11:49PMबंगळूर : प्रतिनिधी

गुंतवणुकीवर मोठा लाभांश देण्याचे सांगून लाखो कोटींची   फसवणूक  केलेल्या पंजाब नॅशनल बँकेचा (पीएनबी) कारनामा जनतेच्या मनात अद्याप असताना बंगळूर महानगरात असाच एक प्रकार घडला आहे. स्टॉक कमोडिटीमध्ये अर्थात वस्तुबाजारामध्ये पैशाची गुंतवणूक करून मोठा परतावा मिळवून देण्याचे सांगत बंगळुरातील विक्रम इन्व्हेस्टमेंट कंपनीने लोकांना  300 कोटींना फसवले आहे. त्याबद्दल चौघांना अटक झाली आहे.या कंपनीमध्ये प्रख्यात माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड, माजी बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांसह कन्‍नड अभिनेत्यांनीही गुंतवणूक केली होती.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये राघवेंद्र श्रीनाथ (वय 39), सूत्रम सुरेश (वय 41), नरसिंहमूर्ती (वय 44), प्रल्हाद (वय 47) यांचा समावेश आहे. यापैकी काही जण मल्लेश्‍वरम, तर काही जण बनशंकरी येथील राहणारे आहेत, अशी माहिती पोलिस उपायुक्‍त एस. शरणाप्पा यांनी दिली.

राघवेंद्र श्रीनाथ हा विक्रम इन्व्हेस्टमेंट कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आहे. त्याने सूत्रम सुरेश, नरसिंहमूर्ती व प्रल्हाद यांच्या मदतीने क्रीडापटू, राजकीय नेते, चित्रपट अभिनेते यांची भेट घेऊन आपल्या कंपनीची माहिती देत जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवत होता. 

गुंतवणूकदारांची पोलिसांत धाव

आमच्या कंपनीत गुंतवणूक केल्यास ती स्टॉक कमोडिटीमध्ये गुंतवून  इतर कुठल्याही गुंतवणुकीपेत्रा जाल्त परतावा देऊ, असे ही चौकडी सांगत होती. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून अनेकांनी गेल्या ऑक्टोबरात मोठी गुंतवणूक केली आहे. मात्र गेल्या सहा महिन्यांत कंपनीने परतावा दिलाच नाही. परिणामी गुंतवणूकदारांनी बनशंकरी पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवून चौघांना अटक केली आहे. कंपनीचे आणखी संचालक बेपत्ता असून, त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.