Tue, Apr 23, 2019 20:01होमपेज › Belgaon › राज्यातील 290 यात्रेकरु अडकले

राज्यातील 290 यात्रेकरु अडकले

Published On: Jul 04 2018 2:12AM | Last Updated: Jul 04 2018 2:29AMबंगळूर : प्रतिनिधी

कैलास मानससरोवर परिसरातील हवामान खराब झाल्यामुळे देशातील 1500 यात्रेकरू 4 दिवसांपासून अडकून पडले होते.  यापैकी कर्नाटकातील 290 जणांचा समावेश आहे. हे सर्व सुखरूप असून त्यांना परत आणण्यासाठी भारतीय वकिलात नेपाळ सरकारच्या संपर्कात असल्याची  माहिती मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी मंगळवारी दिली. राज्यातील 290 जणांमध्ये बेळगावच्याही काही यात्रेकरुंचा समावेश असल्याची माहिती बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे.

अडकलेल्या यात्रेकरुंना आवश्यक ती मदत देण्यात येत आहे. बहुतांश यात्रेकरु हे मंड्या रामनगर, म्हैसूर या भागातील असून त्यांना सुरक्षितरित्या आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारतीय वकिलात  यात्रेकरुंच्या सुटकेसाठी नेपाळगंज-सीमीकोट हिलसा या कैलास मानससरोवरच्या मार्गाने प्रयत्न करीत आहे. 3 जुलै रोजीही तेथील हवामान परिस्थिती जैसे थे होती. त्यामुळे तेथून विमानाचे उड्डाण होऊ शकले नाही. 

ताज्या माहितीनुसार सीमीकोट येथे 525 यात्रेकरू तर हिलसा येथे 550 यात्रेकरू व तिबेटच्या बाजूने 500 यात्रेकरू अडकले आहेत. कर्नाटकातील यात्रेकरूंच्या मदतीसाठी कर्नाटक सरकारने नेपालगंज व सीमीकोट मार्गाने आपल्या प्रतिनिधींना पाठवून यात्रेकरुंना मदत व त्यांच्याशी ते संपर्कात आहेत. यात्रेकरूंचे  जेवण व राहण्याची व्यवस्था केली जात आहे. त्याबरोबरच सीमीकोट येथील डॉक्टरांकडून यात्रेकरुंची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. पोलिस खात्यानेही यात्रेरूंना आवश्यक असणारे सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे. नेपाळ लष्कराची हेलिकॉप्टर यात्रेकरुच्या मदतीसाठी मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशीही माहिती देण्यात आली.

अडकून पडलेल्या यात्रेकरुंच्या सुटकेसाठी राज्याच्या प्रतिनिधींनी सतत त्यांच्या संपर्कात रहावे व त्यांची सुरक्षितपणे सुटका होईतोपर्यंत त्यांना आवश्यकती मदत करीत राहण्याचा आदेश मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी दिला आहे. 

बेळगावातील किती जण?

बेळगाव : प्रतिनिधी

कैलास मानसरोवर परिसरात अडकलेल्या यात्रेकरुंमध्ये बेळगावचेही काहीजणअसल्याची माहिती मिळाली आहे. मात्र बेळगावचे किती यात्रेकरू, हे अधिकार्‍यांनाही स्पष्ट झालेले नाही. प्रत्यक्ष दिल्लीला पोचल्यानंतर हे कळू शकेल, अशी माहिती मदतीसाठी निघालेले अधिकारी आय. शंभूलिंगप्पा यांनी ‘पुढारी’ला दिली. 259 जणांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यश मिळाले आहे. तर काही यात्रेकरुंना दिल्लीतील कर्नाटकात भवनात आणण्यात आले आहे. यापूर्वी बेळगावचे 12 पर्यटक 26 जून रोजी ट्रॅव्हल्सच्या चुकीने अडकून पडले होते. पुढे त्यांनी स्वखर्चाने यात्रेचा प्रवास चालविला होता.