Mon, Jul 22, 2019 00:35होमपेज › Belgaon › ‘सुकन्या  समृद्धी’ साठी 2524  जणांची  नोंदणी

‘सुकन्या  समृद्धी’ साठी 2524  जणांची  नोंदणी

Published On: Sep 07 2018 1:04AM | Last Updated: Sep 06 2018 8:25PMबेळगाव : सतीश जाधव

भारतीय पोस्ट खात्यातर्फे जनसामान्यांसाठी राबविण्यात येणार्‍या अनेक योजनांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुरक्षितता आणि विश्‍वासार्हता मिळत असल्याने पोस्टाकडे गुंतवणुकीत सातत्याने वाढ होत आहे. प्राधान्याने यामध्ये प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, अटल पेन्शन योजना व सुकन्या समृद्धी योजना या योजनांचा समावेश आहे. बेळगाव पोस्ट कार्यालयात जानेवारी ते ऑगस्टपर्यंत या योजनांमध्ये 2968 जणांनी नोंदणी केली आहे. सुकन्या समृद्धीसाठी 2524 जणांनी नोंदणी केली आहे.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना  

वार्षिक हप्ता फक्त 12 रुपये आहे. 2 लाखांपर्यंत अपघात विमा मिळतो. 18 ते 70 वय वर्षापर्यंतच्या बचत खातेधारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच दुर्घटनेत अपंगत्व आल्यास विम्याचा लाभ मिळणार आहे. यासाठी 305 जणांनी नोंदणी केली आहे. 

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना

वार्षिक हप्ता 330 रुपये आहे. 2 लाखापर्यंत विम्याची रक्कम मिळते. 18 ते 50 वय वर्षापर्यंतच्या बचत खाते धारकांना या योजनेचा लाभ मिळतो. विम्याची रक्कम हयातीनंतर मृताच्या कुटुंबियांना मिळते. या योजनेसाठी 83 जणांनी नोंदणी केली आहे.

अटल पेन्शन योजना

18 ते 40 वय वर्षापर्यंतच्या बचत खातेधारकांना याचा लाभ घेता येणार आहे. 60 व्या वर्षी किमान 1 हजार ते 5 हजार पर्यंत दरमहा पेन्शन मिळणार आहे. मासिक वर्गणी आहे. वर्गणीचा काळ 20 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असू शकतो. पॉलिसीधारक पती असेल तर त्याच्या निधनानंतर पत्नीला पेन्शन मिळते. पॉलिसीधारक पत्नी असेल तर तिच्या निधनानंतर पतीला पेन्शन मिळते. दोघांचे निधन झाल्यास वारसदाराला विम्याची मुद्दल मिळते. ही रक्कम बचत खात्यावरून जमा होतो. संबंधित व्यक्तीचे बचत खाते असणे गरजेचे आहे. यासाठी 56 जणांनी नोंदणी केली आहे.

सुकन्या समृद्धी योजना (21 वर्षे) 

दहा वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलींसाठी ही योजना आहे. मुलीच्या 21 व्या वर्षापर्यंत दरमहा 1 हजार रुपये जमा केल्यानंतर 15 वर्षानंतर 1 लाख 80 हजार रुपये रक्कम जमा होते. त्यानंतर सुमारे 5 लाख 26 हजार 991 रुपये मिळतात. या रकमेवर 8.1 टक्के व्याज मिळते. 15 वर्षे पैसे जमा करणे गरजेचे आहे. महिन्याकाठी 250 रुपयांचा हप्ता भरूनही या योजनेत सहभागी होता येते. मुलीच्या 21 व्या वर्षी रक्कम मिळते. या योजनेसाठी 2524 जणांनी नोंदणी केली आहे.