होमपेज › Belgaon › निपाणीत अन्‍नभाग्य योजनेचा 25 टन तांदूळ जप्‍त

निपाणीत अन्‍नभाग्य योजनेचा 25 टन तांदूळ जप्‍त

Published On: Jul 16 2018 1:24AM | Last Updated: Jul 15 2018 11:36PMनिपाणी : प्रतिनिधी

रेशनवर पुरवठा होणार्‍या ‘अन्‍नभाग्य’ योजनेतील 5 लाख 20 हजार रुपये किमतीचा सुमारे 25 टन 500 किलो तांदूळ खुल्या बाजारात विक्रीसाठी नेला जात असता शनिवारी रात्री कोगनोळीजवळ निपाणी ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून जप्त केला. पोलिसांनी चालक व क्‍लीनरला ट्रकसह ताब्यात घेऊन चौकशी चालविली आहे. बेकायदा विक्री करणार्‍या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.

हा तांदूळ विकणार्‍यांसह घेणार्‍यांच्या चौकशीसाठी ग्रामीण पोलिसांचे विशेष पथक हुबळीला रवाना झाले आहे. शनिवारी रात्री 10 च्या सुमारास वरिष्ठांकडून मिळालेल्या सूचनेनुसार सीपीआय किशोर भरणी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीणचे फौजदार निंगनगौडा पाटील यांनी साहाय्यक फौजदार  एम. आर. अंची, के. एस. कल्लापगौडर, हवालदार के.डी. हिरेमठ, के. एस. दड्डी, एन. एस. पुजारी, सीपीआय पथकाचे हवालदार एम. एम. जंबगी, शेखर असोदे यांच्या मदतीने महामार्गावर कोगनोळीजवळ सापळा लावला.

 ट्रकमधून चालक श्रवणकुमार बाबुराव (वय 30, रा. जिजापूर, जि. जोधपूर) व  क्‍लिनर हुबळी येथून मुंबई व पुणे येथे तांदूळ भरून विक्रीसाठी जात असल्याचे दिसून आले. फौजदार पाटील यांनी श्रवणकुमार याच्याकडे चौकशी केली. त्याच्याजवळ तांदूळ खरेदी व वाहतुकीची कोणत्याही प्रकारची अधिकृत कागदपत्रे मिळून आली नाहीत. 

मालाची चौकशी केली असता 50 किलोची 510 पोती असल्याचे दिसून आले. पोलिसांनी ट्रकसह एकूण 35 लाखाचा मुद्देमाल जप्त केल्याचे एफआयआरमध्ये नमूद केले आहे. 

कर्नाटकातील कोप्पळ, बळ्ळारी, होसपेट परिसरात रेशनवर वितरित होणारा तांदूळ आहारासाठी वापरला जात नाही तर तो खुल्या बाजारात चढ्या भावाने विकला जातो. प्राथमिक तपासात हा तांदुळ अन्नभाग्य योजनेतील असल्याचे समोर आले. तो विक्री करणारा व खरेदी करणारा कोण, हे समजल्यानंतरच या प्रकरणाचा उलगडा होणार असल्याची माहिती भरणी यांनी दिली.