Fri, Apr 26, 2019 03:22होमपेज › Belgaon › 25 टक्के निधीचा वापर पाणीपुरवठ्यासाठी

25 टक्के निधीचा वापर पाणीपुरवठ्यासाठी

Published On: Sep 10 2018 1:15AM | Last Updated: Sep 09 2018 10:09PMबेळगाव : प्रतिनिधी

पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, सुरक्षिततेवर कॉन्व्हर्जन्स प्रोजेक्टमध्ये भर देण्यात आला आहे. याकरिता एकूण 1814 कोटी रुपये खर्च करण्यात येत असले तरी त्यापैकी 25 टक्के खर्च चोवीस तास पाणीपुरवठ्याच्या पहिल्या टप्प्यासाठी करण्यात येणार आहे. योजनेतील सर्व कामे राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध खात्यांच्या सहकार्यातून केली जाणार आहेत.

बेळगाव शहराला राकसकोप जलाशय आणि हिडकल जलाशयातून पाणीपुरवठा होतो. त्याचे नियोजन करण्यासाठी चोवीस तास पाणीपुरवठा योजना आखण्यात आली आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्याकरिता एकूण 427 कोटींचा निधी खर्च केला जाईल. हे काम सध्या सुरू आहे. उच्च दाबाच्या वीजवाहिन्या भूमिगत करण्याचे काम हेस्कॉमकडून हाती घेण्यात आले आहे. यासाठी 316.27 कोटी रुपये खर्च करण्यात येत असून आणखी काही महिन्यांत काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

जिल्हा इस्पितळात रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या ठिकाणी केवळ बेळगाव शहरातीलच नव्हे तर आसपासच्या इतर गावातील, सीमाभागातील अनेक रूग्ण उपचार घेतात. वाढत्या लोकसंख्येमुळे येथे 350 कोटी रुपये खर्चून सर्व सुविधांनी युक्‍त सुपर स्पेशालिटी इस्पितळ उभारले जाणार आहे. 

वाढत्या रहदारीमुळे शहरात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यावर उड्डाणपुलांचा पर्याय समोर आहे. कपिलेश्‍वर रेल्वे गेट, फोर्ट रोडवर रेल्वे ओव्हरब्रिजचे काम पूर्ण झाले आहे. सध्या खानापूर रोडवरील पुलाचे काम सुरू आहे. उड्डाणपुलांसाठी एकूण 230 कोटींचा खर्च करण्यात येत आहे.

नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून स्वच्छतेवर भर देण्यात आला आहे. 156 कोटी रुपये खर्चून शहरातील अंडरग्राऊंड ड्रेनेज इतर ठिकाणच्या सांडपाण्याची योग्यरित्या विल्हेवाट लावण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. ड्रेनेज वाहिनी नसणार्‍या ठिकाणी नव्याने व्यवस्था केली जात आहे.

याशिवाय बॅटरीवरील रिक्षा, किफायतशीर घरे, किओस्क, वायफाय, जीपीआरएस, रस्त्याच्या दुतर्फा रोपलागवड,  सार्वजनिक स्वच्छतागृह, जलतरण तलाव, बॅडमिंटन कोर्ट यासह विविध कामे केली जाणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था, बांधकाम खाते, बीएसएनएल, आरोग्य खाते, स्वच्छ भारत अभियान, नगर विकास प्राधिकरण आदींचे सहकार्य या कामांसाठी मिळणार आहे.