Thu, Jun 20, 2019 02:08होमपेज › Belgaon › 2407 लाभार्थ्यांना घरकुल देण्याचा प्रस्ताव मंजूर

2407 लाभार्थ्यांना घरकुल देण्याचा प्रस्ताव मंजूर

Published On: Jan 09 2018 1:32AM | Last Updated: Jan 08 2018 10:54PM

बुकमार्क करा
निपाणी : प्रतिनिधी 

निपाणी शहरात नगरपालिकेने केलेल्या सर्व्हेनुसार 2407 जणांना घरे देण्याचा ठराव सोमवारी आश्रय कमिटीच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला. येत्या 15 दिवसांत हे ऑनलाईन अर्ज भरण्यात येणार आहेत. 

दोन वर्षांनंतर आश्रय कमिटीची  झालेली बैठक तब्बल 5 तास झाल्याने नगरपालिकेच्या इतिहासातील एक वेगळा विक्रम ठरला. बैठकीत रविवारी वाटप केलेली 37 घरांची हक्‍कपत्रे  आणि  2011 साली मंजूर केलेली 600 जणांची यादी रद्द करून शासनाच्या अपार्टमेंट योजनेत त्यांचाही समावेश करण्यात येणार आहे. 37 जणांच्या हक्‍कपत्रावर तब्बल दोन तास चर्चेचे गुर्‍हाळ रंगले.
मध्यंतरी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांनी आश्रय कमिटीच्या सदस्यांच्या उपस्थितीत लाभार्थींची  बैठक घेतली होती. तसेच संंपूर्ण 31 वॉर्डात सर्व्हे करून खरे लाभार्थी शोधले होते. त्यातच रविवारी आमदारांनी फक्‍त 37 जणांंनाच हक्‍कपत्र वाटप केले. 

त्यामुळे ही बैठक वादळी ठरणार अशी चर्चा होती. नगराध्यक्षांसह अन्य सदस्यांनी ही यादी रद्द करून शासनाच्या अपार्टमेंट योजनेत 37 ऐवजी 111 जणांना लाभ देण्याची मागणी केली. तसेच 9 ऑगस्ट 2011 साली मंजूर केलेल्या 600 जणांपैकी 50 टक्के लोकांनी प्लॉट व घरे बांधली आहेत. त्यामुळे ही यादीही रद्द करून, त्यामध्ये राहिलेल्यांचा समावेश 2407 मध्ये करण्यात येणार आहे. ज्यांनी घरकुलासाठी पूर्वी नगरपालिकेकडे पैसे भरले आहेत, पण सध्या घरे बांधली आहेत, त्यांना त्यांच्या पावतीप्रमाणे पैसे परत देण्यात येणार आहेत. ज्यांनी  मंजूर आश्रय घरे विकली आहेत पण ती नावांवर होत नाहीत त्यांना नावांवर करून देण्यात येणार आहेत. तर आश्रय घरात राहणार्‍या भाडेकरूंना ते घर त्यांच्याच नावांवर घर करून देण्याचा निर्णय घेण्यात आला.

नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर म्हणाले, नगरपालिकेकडे 954 प्लॉट शिल्‍लक आहेत. या प्लॉटमध्ये अपार्टमेंट स्वरूपात एकूण 2862 घरकुल बांधता येऊ शकतात.  गेले आठ महिने केलेल्या सर्व्हेमध्ये 2407 पात्र लाभार्थी आढळून आले आहेत. त्यामुळे या सर्वांना शिवाय अन्य वंचित लाभार्थी असल्यास त्यांनाही घरे देता येऊ शकतात. पट्टणकुडी हद्दीतील नगरपालिकेच्या जागेत जाण्यासाठी अण्णाप्पा परीट यांची तीन गुंठे जागा घेण्यात यश मिळविले आहे. त्यांनाही योग्य मोबदल्याची जागा देण्यात येणार आहे. नगरपालिका कर्मचार्‍यांपैकी राहिलेल्यांचाही समावेश करून त्यांनाही घरे मिळावीत. कोणासही श्रेयवादापेक्षा गेल्या अनेक वर्षांची मागणी असणार्‍यांना घरे देण्यासाठी आपले प्रयत्न आहेत. 

चर्चेत आश्रय कमिटी सदस्य शौकत मणियर, जीवन घस्ते, अरूण आवळेकर, संगीता पोटजाळे, ‘हेस्कॉम’ अभियंता चौगुला यांनी भाग घेतला. आयुक्‍त दीपक हरदी यांनी आभार मानले.