बेळगाव : प्रतिनिधी
उत्तर परिक्षेत्र पोलिस महानिरीक्षकांच्या व्याप्तीत येणार्या पाच जिल्ह्यांमध्ये निवडणूक आचारसंहिता काळात केलेल्या कारवाईत 23.07 कोटीची रक्कम जप्त करण्यात आली आहे. याबरोबरच वाहन, मद्यसाठा, आदी वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.
उत्तर परिक्षेत्रात येणार्या बेळगाव, धारवाड, विजापूर, बागलकोट आणि गदग या जिल्ह्यांमध्ये निवडणूक काळात कारवाई करुन पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अनधिकृत रोख रक्कम, मद्य, वाहने जप्त करुन अनेकांवर गुन्हे दाखल करुन कारवाई केली आहे. चेकपोस्टवर तैनात करण्यात आलेल्या पोलिसांकडून सदर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये 80 वाहने, 75 लाख किंमतीचा 2781 लिटर मद्यसाठा, 2.27 कोटी किंमतीच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच 277 प्रकरणांमध्ये 234 जणांना अटक करण्यात आली आहे. बेळगाव जिल्ह्यात 65 प्रकरणांमध्ये 71 जणांना अटक करण्यात आली. 4.40 कोटी रुपये रोख रक्कम, 20 वाहने, 65 लाख किंमतीचा 280 लि. मद्यसाठा, 14 लाख किंमतीच्या वस्तू, जप्त करण्यात आल्या आहेत.
विजापूर जिल्ह्यामध्ये 16 प्रकरणांत 17 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 1.87 कोटी रु. रोख रक्कम, 14 वाहने, 3 लाख किमतीची 699 लि. मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. बागलकोट जिल्ह्यात 59 प्रकरणांमध्ये 55 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 1.52 कोटी रु. रोख रक्कम, 10 वाहने, 66 हजार किंमतीचा 279 लि. मद्य साठा, 19 लाख किंमतीच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.
धारवाड जिल्ह्यामध्ये 23 प्रकरणांमध्ये 23 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 2.54 लाख रोख रक्कम, 6 वाहने, 87 हजार किंमतीचा 270 लि. मद्यसाठा 1.84 कोटींच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहे. गदग जिल्ह्यामध्ये 114 प्रकरणांमध्ये 68 जणांना अटक करण्यात आली आहे. 15.23 कोटी रु., 30 वाहने, 51 हजार किंमतीचा 1252 लि. मद्यसाठा, 8.67 कोटी रुपयांच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.