Wed, Apr 24, 2019 01:54होमपेज › Belgaon › चोर्ला मार्गावर २० वन्यजीवांचा बळी

चोर्ला मार्गावर २० वन्यजीवांचा बळी

Published On: Dec 21 2017 1:54AM | Last Updated: Dec 20 2017 10:29PM

बुकमार्क करा

बेळगाव : महेश पाटील

बेळगाव-गोव्याला जोडणार्‍या आणि जवळचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणार्‍या जांबोटी-चोर्ला या महामार्गावरून अवजड  वाहनांची सातत्याने वाहतूक होत असून या रस्त्याची पुन्हा एकदा दुरवस्था झाली आहे.  या मार्गावर सुसाट धावणार्‍या अवजड वाहनांबरोबरच अन्य वाहनांमुळे वन्यप्राण्यांचे जीवन धोक्यात आले आहे. दोन वर्षात 20 हून अधिक प्राण्यांचा बळी गेला आहे. याकरिता तातडीने या रस्त्यावरून होणार्‍या अवजड वाहतुकीवर निर्बंध घालण्याची गरज आहे. 

हा परिसर भीमगड अभया रण्यामध्ये मोडतो. असे असतानाही रात्रीच्यावेळी आणि दिवसाही मोठ्या प्रमाणात अवजड वाहतुकीत वाढ झाली आहे. यामुळे या मार्गावर अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचा फटका वन्यजीव प्राणी पक्षी यांना बसू लागला आहे. अरण्य विभाग आणि पोलिस खात्याने या अवजड वाहतुकीकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केल्याचे आढळून आले. जांबोटीपासून चोर्लापर्यंत चार ठिकाणी वनखात्याने आपले नाके बसविलेले आहेत. मात्र या ठिकाणी असलेल्या कर्मचार्‍यांकडून अवजड वाहनांवर किंवा रात्रीच्यावेळी गस्त घालत असताना अन्य वाहनांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. 

गोव्यामधून चोर्ला मार्गे बेळगाव आणि गोव्याला जाणार्‍या वाहनांची संख्या दिवसा जास्त असते. रात्री 10 नंतर कदंबा आणि कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बसगाड्या धावत नाहीत. काही खासगी बसगाड्या व वाहने वगळता अवजड वाहनांची संख्या जास्त असते. 

भीमगड अभयारण्य अस्तित्वात आल्यापासून वन्यप्राण्यांचे अपघात टाळण्यासाठी खानापूर, हेम्माडगा पासून अनमोडपर्यंतच्या गोवा-बेळगावला जोडणार्‍या  रस्त्यावर  सायंकाळी 6 नंतर पहाटे 6 वा. पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. या ठिकाणी गेल्या दोन वर्षात अस्वल, विविध प्रकारचे साप, माकडे व अन्य अशा जवळपास 20 हून अधिक प्राणी मृत्युमुखी पडल्याने या मार्गावर वाहतुकीला निर्बंध घालण्यात आले आहेत. 

जांबोटीपासून चोर्ला तसेच सुरलपर्यंत विविध जातीच्या वन्यजीवांचे वास्तव्य आहे. यामध्ये प्रामुख्याने वाघ, हत्ती, अस्वल, बिबट्या, चित्तळ, माकड, गवारेडा, साळींदर तसेच नाग, घोणस व अन्य सरपटणार्‍या प्राण्यांचा सातत्याने वावर असतो. गोवा सरकारने आपल्या हद्दीत भीमगड अभयारण्य असून वाहने सावकाश चालवा, असे नामफलक उभारण्याबरोबरच वाहनांच्या वेग मर्यादेवर निर्बंध घातले आहेत. मात्र याची अंमलबजावणी कर्नाटक हद्दीत होत नसल्याचे आढळून आले आहे. आणि सर्वात जास्त वन्यप्राण्यांचे बळी कर्नाटक हद्दीत झाल्याचे अहवालामधून उघड झाले आहे.