होमपेज › Belgaon › शिस्तीच्या नावाखाली २० विद्यार्थ्यांचे मुंडण

शिस्तीच्या नावाखाली २० विद्यार्थ्यांचे मुंडण

Published On: Feb 13 2018 2:04AM | Last Updated: Feb 13 2018 12:07AMबेळगाव : प्रतिनिधी

विद्यार्थ्यांना धडे देण्याऐवजी शिस्त लावण्याच्या नावाखाली 20 विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे मुंडण करण्याचा प्रकार काकती येथील सेंट पीटर्स माध्यमिक शाळेमध्ये घडला. आपल्या मुलांच्या डोक्याचा मुंडण केल्याचा प्रकार लक्षात येताच संतप्‍त पालकांनी शाळेसमोर गेट बंद आंदोलन छेडले. अखेर जिल्हा शिक्षणाधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन दोषींवर कारवाई करण्याचा आदेश दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

काही विद्यार्थी गणवेशात आले नाही, तर काही जणांनी गृहपाठ केला नव्हता. त्यामुळे  मुख्याध्यापिका किरण देसाई यांनी सर्व विद्यार्थ्यांना एका ओळीत उभा करून शेजारच्या केस कर्तनालयातील व्यक्‍तीला बोलावून विद्यार्थ्यांसह विद्यार्थिनींचेही मुंडण केले. यामुळे घाबरगुंडी उडालेल्या विद्यार्थ्यांनी एकच आकांत केला. विद्यार्थी रडत होते. काही जणांनी शाळेतून पळून जाऊन घडलेला प्रकार पालकांना सांगितला.
ही घटना समजताच काकतीसह परिसरातील पालकांनी शाळेकडे धाव घेऊन मुख्याध्यापिका देसाई यांना जाब विचारला. त्यानंतर गेट बंद करून आंदोलन छेडले. शाळेच्या परिसरात तणाव निर्माण झाल्याने काकती पोलिसांनीही धाव घेतली. 

घटनेची माहिती समजताच जिल्हा शिक्षणाधिकारी ए. बी. पुंडलिक, तालुका गटशिक्षणाधिकारी लिलावती हिरेमठ यानी शाळेला भेट देऊन घडलेल्या घटनेची माहिती घेतली. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिकेला धारेवर धरले. ज्यावेळी अधिकारी चौकशीसाठी पोहोचले, त्यावेळी मुंडण करण्यात आलेल्या काही विद्यार्थ्यांना शाळेत बसवून शिकविले जात असल्याचेही आढळून आले. 

केस कर्तनकारावर होणार कारवाई!

सेंट पीटर्स शाळेमधील विद्यार्थ्यांच्या मुडण प्रकरणामध्ये सहभागी असलेल्या काकती येथील त्या केस कर्तनकारावरही कारवाई होणार आहे. वास्तविक त्याने याबाबत  मुख्याध्यापिकेला हे चुकीचे असल्याचे सांगणे गरजेचे होते. त्याच्यावर कारवाई होणार असल्याचे काकती पोलिस निरीक्षक रमेश गोकाक यांनी सांगितले. 

शिस्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांचे मुंडण करणे हा धक्‍कादायक प्रकार आहे. शाळेची मुख्याध्यापिका किरण देसाई आणि संस्थाचालकांना या संदर्भात ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या मनावर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी पालकांशी संवाद साधला आहे.  -ए. बी. पुंडलिक, जिल्हा शिक्षणाधिकारी