Sat, Mar 23, 2019 01:56होमपेज › Belgaon › जिल्ह्यातील 184 शाळांचे होणार विलिनीकरण

जिल्ह्यातील 184 शाळांचे होणार विलिनीकरण

Published On: Jul 04 2018 2:12AM | Last Updated: Jul 03 2018 11:42PMबेळगाव : भाऊराव कणबरकर 

खासगी शाळांकडे पालकांचा ओढा, आरटीई अंतर्गत गरीब, दुर्बल कुटुंबांतील विद्यार्थ्यांना खासगी शाळांतून प्रवेश दिला जात आहे. यामुळे सरकारी शाळांतील पटसंख्येवर परिणाम होत आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील मराठी, कन्नड व ऊर्दूसह 20 पटसंख्या असलेल्या 184 शाळांचे अन्य शाळेत विलिनीकरण होणार आहे. सर्व शाळांची यादी जिल्हा शिक्षणाधिकारी ए. बी. पुंडलिक बंगळूरला पाठविणार आहेत. 

तालुका गट शिक्षणाधिकारी यांनी सर्व शळांची माहिती जिल्हा शिक्षणाधिकारी यांना पाठविली आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एन. महेश यांनी 20 पटसंख्या असलेल्या शाळांची यादी राज्यातील सर्व जिल्ह्या शिक्षणाधिकारी यांच्याकडून एकत्रित केली  आहे.  यापूर्वी  शिक्षण खात्याने 10 व 15 पटसंख्या असलेल्या शाळांची  यादी एकत्रित केली होती. शिक्षण खात्याने जुलैअखेरपर्यंत पहिलीच्या वर्गात  प्रवेश द्यावा. शाळांतील पटसंख्या वाढीसाठी शिक्षकांसह एसडीएमसी व लोकप्रतिनिधींना सांगण्यात आले आहे.

बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील सर्वात अधिक खानापूर तालुक्यातील 91 शाळांचे विलिनीकरण होणार आहे. त्यामध्ये 83 मराठी शाळा असून 8 शाळा ऊर्दूच्या आहेत. शाळा विलिनीकरणास खानापुरातून विरोध होत आहे. कारण बर्‍याच शाळा जंगलभागात आहेत. त्यांचे विलिनीकरण एक किंवा दोन कि. मी. अंतरावर असलेल्या शाळांमध्ये करावे लागणार आहे. सर्वात कमी कित्तूर तालुक्यातील 5 शाळांचे विलिनीकरण करण्यात येणार आहे. त्यामध्ये 3 ऊर्दू व 2 कन्नड शाळा आहेत. बेळगाव शहरातील 10 मराठी असून 6 ऊर्दू शाळा आहेत. कन्नड माध्यमातील एकाही शाळेचे विलिनीकरण होणार नाही. बेळगाव ग्रामीणमधील 20 शाळांचे विलिनीकरण होणार आहे. 

सौदत्ती येथील 22 सरकारी शाळा, बैलहोंगल 15, रामदुर्ग 15 सरकारी शाळांच्या विलिनीकरणाचा घाट सुरू आहे. काही सरकारी शाळांतून 10 ते 15 विद्यार्थी आहेत. तेथे चार ते पाच शिक्षक कार्यरत आहेत. त्यासाठी शिक्षकांना शिकवण्यास अडचण येत आहे. यासाठी शाळांचे विलिनीकरण करून अतिरिक्त शिक्षकांची अन्य शाळेत बदली करण्यात येणार आहे.