Fri, Jul 19, 2019 07:04होमपेज › Belgaon › कारवारमधील १८ टक्के शेतजमीन पडिक

कारवारमधील १८ टक्के शेतजमीन पडिक

Published On: Jun 03 2018 1:12AM | Last Updated: Jun 02 2018 8:43PMकारवार : प्रतिनिधी 

कारवार जिल्ह्यातील एकूण शेतजमिनीपैकी 18 टक्के जमिन विनावापर असून कालांतराने ती पडिक होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 10 लाख 24 हजार 679 हेक्टर इतकी शेतजमीन असलेला कारवार जिल्हा हा राज्यातील सर्वात मोठा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात 8 लाख 13 हजार हेक्टर जंगल क्षेत्र आहे. तर 1 लाख 11 हजार 538 हेक्टर इतकी शेतजमीन आहे यापैकी 18 टक्के जमीन अनेक वर्षापासून विनावापर पडून आहे. 

अनियमित पाऊस, वाढती मजुरी, शेतीमालाचे पडणारे भाव, आणि बियाणे व खत यावर करावी लागणारी मोठी गुंतवणुक या कारणांमुळे कृषी व्यवसाय जिल्ह्यामध्ये तोट्याचा बनतो आहे. परिणामी जिल्ह्यातील युवावर्ग नोकर्‍यांसाठी मोठ्या शहरांकडे धाव घेत आहेत. काही ग्रामस्थांनी शेतीकडे पाठ वळविली आहे. यामुळे शेतजमिनी रिकाम्या पडत आहेत.  कृषी व्यवसाय हा या भागात मोठे आव्हान ठरत आहे. जिल्ह्यातील युवा पिढी विशेषत: किणारपट्टीभागातील पदवीधर युवक कृषी व्यवसायाकडे वळताना दिसत नाहीत. वयस्कर लोक मात्र शेतातच राबत आहेत.

अनेक खेड्यांमधून शेतजमीनी पडून असल्यामुळे त्या भागातून कृषी उत्पादन नावालाच घेतले जात आहे. किनारपट्टी भागातील युवक उद्योगधंद्यासाठी गोव्यात जात आहेत. कारवारहून सकाळी गोव्याला जाण्यासाठी रेल्वे असून ती युवकांनी भरलेली असते. सुमारे 1 हजार नागरिक युवक गोव्याला जातात. संध्याकाळी येण्यासाठी त्यांना सोयीची रेल्वे आहे. जिल्ह्यातील 12 तालुक्यांपैकी कारवार तालुक्यातील शेतजमीनमोठ्याप्रमाणात पडीक आहे. केवळ 40 टक्के जमीनीवर पिके घेतली जातात. उर्वरित 60 टक्के शेतजमीन वापरातच नाही. या तालुक्यातील 9 हजार 233 हेक्टर जमीन नापिक आहे. या भागातील लोकांना शेतीमध्ये अजिबात रस नाही. कृषी खात्याने यंत्रोपकरणे आणि बिबीयाणे उपलब्ध करून दिले असले तरी शेतकर्‍यांची याबाबात अनास्थाच दिसते.