Mon, Apr 22, 2019 22:03होमपेज › Belgaon › उचगाव येथे उद्या १६ वे साहित्य संमेलन

उचगाव येथे उद्या १६ वे साहित्य संमेलन

Published On: Jan 20 2018 1:39AM | Last Updated: Jan 19 2018 9:04PMउचगाव : वार्ताहर

मळेकरणी साहित्य अकादमी आणि उचगाव ग्रामस्थ आयोजित 16 वे साहित्य संमेलन रविवार दि. 21 रोजी होणार आहे. संमेलनाध्यक्षपदी सातारा येथील डॉ. प्राचार्य राजेंद्र कुंभार राहणार आहेत. व्याख्यान, कथाकथन व हास्यकविसंमेलन रंगणार आहे.

संमेलनामध्ये सहभागी होणार्‍या साहित्यिकांचा परिचय-

संमेलनाध्यक्ष डॉ. राजेंद्र कुंभार
डॉ. कुंभार हे सातारा येथे अध्यापनाचे काम करतात. त्यांनी रसायनशास्त्रात पीएच.डी. पदवी मिळविली आहे. इतिहास, अर्थशास्त्र, धर्मशास्त्र, मराठी-हिंदी साहित्य, मानववंशशास्त्राचा त्यांचा गाढा व्यासंग आहे. त्यांची सारे काही पाण्यासाठी, महात्मा फुले साहित्यातील शिवाजी महाराज, पर्यावरण प्रदूषण, म. फुले यांच्या साहित्यातील सौंदर्यशास्त्र, शोध अंबाबाईचा आदी पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

व्याख्याते अ‍ॅड. देवदत्त परुळेकर
बेळगावचे सुप्रसिद्ध वारकरी, ज्ञानोपासक, कीर्तनकार कै. दिगंबर परुळेकर यांचे ते चिरंजीव आहेत. त्यांनी आजवर विविध दैनिकांतून संतसाहित्यावर सात हजारहून अधिक लेख लिहिले आहेत. त्यांची एक तरी ओवी अनुभवावी, तुका म्हणे, नामा म्हणे, एका जनार्दनी, विठोची लेकरे, ताटी उघडा ज्ञानेश्‍वरा, भक्तीचा मळा ही पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांना कोकण साहित्य परिषदेचा नेरुरकर, डॉ. प्र. न. जोशी संतसाहित्य पुरस्कार, सांगली वाचनालयाचा पुरस्कार मिळाला आहे.

कवी नारायण पुरी
हे नांदेड जिल्ह्यातील आटूर येथील आहेत. ते ‘कवितेच्या गावा जावे’ हा कार्यक्रम सादर करतात. त्यांना आजवर अशोक पुरस्कार, यशवंतराव चव्हाण काव्यनिर्मिती पुरस्कार मुंबई, जागर काव्यरत्न पुरस्कार औरंगाबाद, समाजभूषण पुरस्कार मिळाले आहेत.

कवी अनिल दीक्षित
कला, चित्रपट, नाट्य या क्षेत्रात  अनिल दीक्षित कार्यरत आहेत. त्यांनी काजळमाय, ब्लफमास्टर, लकी-ड्रॉ, धूम मचाले आदी नाटकातून भूमिका केल्या आहेत. त्यांचा चित्रकला हा छंद आहे. त्यांना गदिमांचे वारसदार, महाराष्ट्र कामगार परिषद, छावा काव्य पुरस्कार, शिवांजली काव्यगौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे.

कवी  प्रा. जयराम खेडेकर 
हे जालना येथील असून त्यांचे ऋतुवंत, मेघवृष्टी, रानझुले, अवकळा हे काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. ते ऊर्मी या कवितेला वाहिलेल्या अनियतकालिकाचे संपादन करतात. त्यांना विविध पुरस्कार लाभले आहेत.

कथाकथनकार- संजय कळमकर
कथा, कादंबरी, एकांकिका, नाटके, चित्रपटकथा अशा सर्व क्षेत्रात त्यांनी लेखन केले आहे. त्यांची भग्न, टोपीवाले कावळे या कादंबर्‍या,  बे एके बे हा कथासंग्रह प्रसिद्ध आहे. त्यांनी जयवंत दळवी यांच्या कादंबरीचा विवेचक अभ्यास या विषयावर पीएचडी केली आहे.