Thu, May 23, 2019 04:24होमपेज › Belgaon › कर्नाटकात १६ लाख खटले प्रलंबित

कर्नाटकात १६ लाख खटले प्रलंबित

Published On: Apr 08 2018 2:10AM | Last Updated: Apr 07 2018 11:56PMबेळगाव : प्रतिनिधी

कर्नाटकामध्ये 16.3 लाख खटले प्रलंबित आहेत. दक्षिण भारतात सर्वाधिक खटले प्रलंबितमध्ये कर्नाटकाचा प्रथम क्रमांक लागतो. यापैकी कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये 2.2 लाख खटले आहेत. पैकी 20 टक्के खटले ज्येष्ठ नागरिक व महिलांनी दाखल केलेले आहेत. 36,000 खटले दहा वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून प्रलंबित आहेत.

कर्नाटकातील सर्व जिल्ह्यांतील व त्यांच्या समकक्ष न्यायालयांमधून 14 लाख खटले प्रलंबित आहेत. इतर राज्यांपेक्षा कर्नाटकामध्ये खटल्यांचे हे प्रमाण सर्वाधिक असल्याचे कायदेतज्ज्ञांचे मत आहे. डिसेंबर 2017 अखेरची खटल्यांची ही प्रलंबित संख्या आहे. दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ व तमिळनाडूपेक्षा कर्नाटकातील खटल्यांची संख्या जास्त आहे. आंध्र प्रदेश व तेलंगणामधील प्रलंबित खटल्यांची संख्या 12.7 लाख आहे. तमिळनाडूमध्ये 13.3 लाख व केरळमध्ये 13.9 लाख खटले आहेत.

कर्नाटकातील प्रलंबित खटल्यांची संख्या कमी करण्याकरिता न्यायाधीशांची संख्या वाढविली पाहिजे, असे कर्नाटक उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश के. एल. मंजुनाथ यांनी म्हटले आहे. न्यायाधीशांची निवड करताना त्यांना सर्व प्रकारच्या केसीस हाताळता आल्या पाहजेत. कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये एकूण 62 मंजूर न्यायाधीशांपैकी 30 जागा भरण्यात आल्या आहेत. 1303 मंजूर न्यायाधीशांपैकी जिल्ह्यातील व समकक्ष न्यायालयांमध्ये 976 न्यायाधीशांच्या जागा भरावयाच्या आहेत. मागील महिन्यात एक लाख नवीन खटल्यांची भर पडली आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश संतोष हेगडे यांनी यासंदर्भात म्हटले आहे की, खटल्यांची वाढती संख्या एकदम निकालात काढता येणार नाही. यासाठी सरकार, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय यांनी एकत्र येऊन संयुक्‍तिक तोडगा काढला पाहिजे. अपिलांची संख्याही कमी केली पाहिजे.

 कनिष्ठ न्यायालयातील व उच्च न्यायालयातील खटले याची छाननी करून काही खटल्यांना दंड लावण्याची आवश्यकता आहे. कर्नाटकामध्ये एकूण प्रलंबितमध्ये 532 टक्के खटले फौजदारी आहेत.

Tags : Karnataka news,  16 lakh pending cases,