Wed, Aug 21, 2019 01:55होमपेज › Belgaon › वरुणराज बरसले अन् सर्पराज खवळले

वरुणराज बरसले अन् सर्पराज खवळले

Published On: Jul 19 2018 1:36AM | Last Updated: Jul 18 2018 11:48PMबेळगाव : प्रतिनिधी

गेल्या अडिच महिन्यात बेळगाव शहर परिसरातील सुमारे दीडशे जणांना  संर्पदंश झाला आहे. यामधील दोघे दगावले आहेत. पावसाला सुरुवात झाल्यानंतर सापांचे नैसर्गिक अधिवास नष्ट झाल्यामुळे हा प्रकार घडला आहे. सर्पदंश झालेल्यांमध्ये बहुतांश शेतकर्‍यांचाच समावेश आहे.

जून ते ऑगस्ट दरम्यान सर्पदंशाच्या घटना अधिक होतात, अशी माहिती येथील शासकीय रुग्णालयाकडून देण्यात आली. गतवर्षाच्या तुलनेत यंदा सर्पदंशाचे प्रकार अधिक झाले आहेत. मेच्या मध्यानंतर अवकाळी पावसाला सुरुवात झाली. यामुळे या दरम्यान, सर्पदंशाच्या प्रकारात वाढ झाली.  येथील शासकीय रुग्णालयात बहुतांश बेळगाव तालुक्यातील सर्पदंश झालेले रुग्ण दाखल होतात. संपूर्ण जिल्ह्यातूनही गंभीर असलेले सर्पदंशाचे रुग्ण या रुग्णालयात दाखल होतात. 

मे 2018 मध्ये जेव्हा पावसाला सुरुवात झाली तेव्हा 48 जणांना तर जून महिन्यात 65 जणांना सर्पदंश झाला. जुलैच्या आजअखेर 37 जणांना  सर्पदंश झाला आहे. रोज तीन ते चार रुग्ण सर्पदंशाचे रुग्ण येत आहेत. या सर्वावर येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले तर काही जणांवर अजून उपचार सुरु आहेत. यामधील दोघांना उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. यापूर्वीच्या महिन्यामध्ये सर्पदंशाच्या सर्वसाधारणपणे दहा ते बारा घटना घडल्या आहेत. 

पावसाचे पाणी बिळामध्ये जाऊन ही बिळे मुजली जातात. तेव्हा साप बाहेर येतात. रस्त्यावर, घरांच्या आडोशाला आसरा घेतात. अशावेळी माणसांचा सपर्क झाल्यानंतर त्यांना सर्पदंश होतो.

इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध

पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर सर्पदंशामध्ये वाढ झाल्याने येथील शासकीय रुग्णालयामध्ये पुरेसा औषध साठा उपलब्ध करुन ठेवण्यात आला आहे. सर्पदंशावर ‘स्नेक व्हिनम अँटीसिरम’ इंजेक्शन देण्यात येते. याचा कालावधी सहा महिन्याचा असला तरी औषधे कालबाह्य होत नाही. असा साठा वेळेतच संपत आहे. आवश्यकतेनुसार औषधे  मागवण्यात येतात. सुरुवातीला सर्पदंश झालेल्या रुग्णाला अतिदक्षता विभागात ठेवण्यात येते. त्यानंतर दुसर्‍या दिवशी बाहेर हलवले जाते. सर्वसाधारपणे तीन दिवसात रुग्णांना घरी पाठवण्यात येते. सर्पदंशावर वेळीच उपचार झाल्यास कोणताच धोका होत नाही, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. हुसेनसाहेब काजी यांनी दिली. या इंजेक्शनची खासगी रुग्णालयातील किंमत ही पाचशे ते आठशे रुपयांच्या घरात आहे.