खानापूर : प्रतिनिधी
चार वर्षापासून शिक्षक भरतीकडे होणारे दुर्लक्ष आणि बदली व निवृत्तीनंतर रिक्त झालेल्या शिक्षकांच्या जागा यामुळे खानापूर तालुक्यात प्राथमिक शिक्षकांच्या तब्बल 136 जागा रिक्त आहेत. त्यामुळे तात्पुरती बदली, एका शिक्षकावर दोन-दोन शाळांची जबाबदारी आणि नियोजन तत्त्वावर अधारित बदली असे जुजबी इलाज करून शाळांचा गाडा कसातरी पुढे रेटण्याची नामुष्की शिक्षण विभागावर आली आहे.
शिक्षकांची कमतरता ही तालुक्यातील शाळांसाठी नवीन बाब राहिलेली नाही. चार वर्षापासून शिक्षक भरतीच झाली नसल्याने अतिथी शिक्षकांच्या सहकार्याने शाळा चालविण्याची कसरत शिक्षणाधिकारी करत आहेत. यंदाचे वर्ष निवडणुकांचे होते. यामुळे शिक्षक भरती होऊन किमान यावर्षी तरी शाळांना कायमस्वरूपी शिक्षक मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र राजकारणात स्वतःची खुर्ची शाबूत ठेवण्याच्या कामात मग्न असलेल्या नेत्यांना शिक्षक भरती आणि शिक्षकांअभावी असलेल्या शाळांच्या दुखण्याविषयी काहीच देणेघेणे नसल्याचे दिसून येत आहे.
नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय आढावा बैठकीत गटशिक्षणाधिकारी उमा बरगेर यांनी तालुक्यातील मराठी, कन्नड आणि ऊर्दू माध्यमाच्या सरकारी प्राथमिक शाळांमध्ये 136 शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे आगामी आठ दिवसांत साहाय्यक शिक्षक ते मुख्याध्यापक या पदांची बढती प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये अनेक सहाय्यक शिक्षकांना मुख्याध्यापकपदी बढती मिळणार असल्याने रिक्त शिक्षकांच्या जागांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. परिणामी आजघडीला किमान 150 शिक्षकांची तालुक्याला नितांत गरज आहे.
शिक्षक भरतीद्वारे कायमस्वरुपी शिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत रिक्त जागांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये. याकरिता अतिथी शिक्षकांची नेमणूक करून शाळांचे नियोजन केले जात आहे. याकरिता 60 डी.एड. धारकांची अतिथी शिक्षक म्हणून नियुक्ती केली जात आहे. ही नियुक्ती एका वर्षासाठी करण्यात येते. मागच्या शैक्षणिक वर्षाच्या समाप्तीनंतर या वर्षासाठी अतिथी शिक्षकांची अद्याप नियुक्ती करण्यात आलेली नाही. यामुळे ज्या एक शिक्षकी शाळांना अतिथी शिक्षकांचा आधार होता, त्याही आता शिक्षकांअभावी बंद होण्याची शक्यता आहे.
अतिथी शिक्षकांच्या नेमणुकीबाबत राज्याच्या शिक्षण विभागाने आदेश देणे अनिवार्य आहे. मात्र अजून मंत्रिमंडळ खातेवाटपच झाले नसल्याने अतिथी शिक्षकांची भरती प्रक्रियाही रखडली आहे. तालुक्याला 100 अतिथी शिक्षकांची गरज असून याप्रश्नी आ. डॉ. अंजली निंबाळकर यांनी पाठपुरावा करुन तालुक्याला अधिकाधिक अतिथी शिक्षक मंजूर करावेत, अशी मागणी होत आहे.