Sun, Aug 25, 2019 12:16होमपेज › Belgaon › अकोळ मराठी शाळेला १२५ वर्षांचा इतिहास

अकोळ मराठी शाळेला १२५ वर्षांचा इतिहास

Published On: Jul 12 2018 1:40AM | Last Updated: Jul 11 2018 10:06PMअकोळ : महालिंग पाटील

येथील प्राथमिक मराठी शाळेला जिल्हापातळीवर वैभवशाली इतिहास आहे. मराठी शाळेने १२५ वर्षात मानाचे स्थान मिळवून नावलौकिक मिळविला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात शाळेत शिक्षण घेतलेले विद्यार्थी आजही शाळेचे कौतुक करतात. अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात उल्‍लेखनीय जबाबदारी पार पाडत आहेत.या शाळेत सुरुवातीस चार वर्ग होते. सातवीपर्यंतची शाळा सुरु झाल्यावर सध्याच्या झेंडा चौकात कार्यालय व तीन वर्ग होते. यानंतर प्राथमिक कृषी पत्तीन बँकेजवळील चावडीत दत्त मंदिरात शाळा सुरु झाली. कालांतराने कराळे यांची इमारत, जुनी चावडी, भैरवनाथ मंदिर येथे शाळा भरत असे. शाळेची नवीन इमारत २४ जून १९६२ रोजी  उभी राहिली.

शिक्षण खात्याचे अधिकारी अकोळ येथील मराठी शाळा पाहण्यासाठी येत असत. अकोळ शाळेचे जिल्ह्यात खेळ आणि अभ्यासात नाव होते. सूत कताई व कापड विणणे स्पर्धेत नेहमी नंबर येत असे. यावेळी चिकोडी केंद्रात सर्वाधिक मुले या शाळेतील होती. शाळेतील मुले गुणवत्तापूर्ण आणि हुशार होती.शिक्षक मंडळी चारित्र्यसंपन्‍न आणि निर्व्यसनी होती. सातवी पास झाल्यानंतर लगेचच नोकरी मिळत असे. सातवी पास झाल्यावर पट्टणकुडीला इंग्रजीचे ज्ञान घेण्यासाठी आप्पासाहेब गुरव, पोपटलाल शाह-निपाणी, रामचंद्र राऊत, धनाजी राऊत ही मंडळी सायकलने जात असल्याचे सांगतात.

५० वर्षात उत्तम सेवा बजावलेले शिक्षक

गेल्या ५० वर्षात अकोळ शाळेतील शिक्षकांनी उत्तम पेशा सांभाळला. बाबुराव पोतदार, दांडेकर गुरुजी, मुख्याध्यापिका नर्मदाबाई कोथळे, बी. एल. कमते, बंडू मास्तर, कापशे गुरुजी, सदाशिव वागळे, कौस्तुभ कांबळे, दादू मराठे, लहू गुरुजी, रामचंद्र चौगुले, थरकार गुरुजी, मुख्याध्यापक एल. टी. जाधव, राऊ कदम यांनी उत्तम सेवा बजावली.