Sun, Jul 21, 2019 01:59होमपेज › Belgaon › बारावी निकाल : मजुराची ‘विद्या’ जिल्ह्यात पहिली

बारावी निकाल : मजुराची ‘विद्या’ जिल्ह्यात पहिली

Published On: May 02 2018 1:18AM | Last Updated: May 02 2018 12:58AMबेळगाव : प्रतिनिधी

चांगले गुण मिळवण्यासाठी सुविधा नसल्या तरी चालतील; पण कष्टाची तयारी पाहिजे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मजुराच्या मुलीने जिल्ह्यात बारावीत प्रथम क्रमांक पटकावला असून, संपूर्ण राज्यात ती चौथ्या स्थानी आहे.

विद्या सदाशिव गुडोडगी असे या विद्यार्थिनीचे नाव असून, उगार खुर्द (ता. अथणी) येथील डॉ. शिवानंद शिक्षण संस्थेच्या श्रीहरी पदवीपूर्व महाविद्यालयाची वाणिज्य शाखेची ती विद्यार्थिनी होती. तिला 600 पैकी 592 म्हणजे 98.66 टक्के गुण आहेत.

विद्याने कन्नड, बिझिनेस स्टडीज्, अकौंटन्सी, कॉम्प्युटर सायन्स या विषयांत पैकीच्या पैकी म्हणजे 100 गुण व अर्थशास्त्र 99, इंग्लिशमध्ये 93 गुण मिळविले आहेत. तिचे वडील सदाशिव हे मोलमजुरीची कामे करतात. यावरूनच तिच्या कौटुंबिक परिस्थितची कल्पना येते. 

अत्यंत गरीब कुटुंबातील एका मुलीने परीक्षेत साधलेले उत्तुंग यश इतर विद्यार्थ्यांना आदर्शवतच ठरले आहे. श्रीहरी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व  कर्मचार्‍यांनी विद्या हिच्या घरी भेट देऊन तिचे खास अभिनंदन केले. पुढील शैक्षणिक वाटचालीसंबंधी प्राध्यापकांनी विचारले असता विद्याने  सी.ए.होण्याचा मानस व्यक्त केला. 

निकालात बेळगाव व चिकोडी शैक्षणिक जिल्ह्याची घसरण झाली तरी    जिल्ह्यातील एका विद्यार्थिनीने राज्यात  चौथा क्रमांक मिळवून आपल्या गावचेे जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले 

दिव्यांगावर मात करत मिळविले 90 टक्के

बेळगाव : प्रतिनिधी 

शारीरिक अपंगत्व असले तरी जिद्दीपुढे कोणतेच ध्येय साध्य करणे अशक्य नाही. एका अपघातात दोन्ही हात गमावलेल्या विद्यार्थ्याने कृत्रिम हाताद्वारे बारावी परीक्षा देऊन विज्ञान विभागात 90.33 टक्के गुण मिळविले आहेत. 

अमित तल्लूर असे त्या विद्यार्थ्याचे नाव असून, तो येथील आरएलएस महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. एका अपघातात अमितला दोन्ही हात गमवावे लागले. मात्र, या अपंगत्वाला कवटाळून न बसता त्याने जिद्दीने शिक्षण घेतले आहे. बारावीच्या परीक्षेत अमितने विज्ञान शाखेतून 600 पैकी 542 गुण घेऊन (90.33) टक्के उतीर्ण झाला आहे. 

अपघातात अमितला हात गमवावे लागले होते. त्यावेळी तो इयत्ता सहावीत शिकत होता. तरी त्याने जिद्दीने शिक्षण घेण्याचे ठरविले. कृत्रिम हात बसवून त्याने परीक्षा दिल्या आहेत. नुकताच झालेल्या बारावी परीक्षेमध्ये पीयुसी बोर्डाने अपंग विद्यार्थ्यांमध्ये याची गनना करून परीक्षेस बसण्याची सोय केली होती. यासाठी 30 मिनिटाचा अधिक कालावधी देण्यात आला होता. मात्र, अमितने इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच वेळेत पेपर लिहिले होते. केवळ इंग्रजी पेपरसाठीच त्याने 10 मिनिटाचा अधिक कालावधी घेतला होता.  

अमितने आपला उजवा हात गमविल्याने कृत्रिम हाताद्वारे परीक्षा लिहिण्याचा सराव केला होता, असे प्राचार्य एस. जी. नंजप्पन्नावर यांनी सांगितले.