Thu, Jul 18, 2019 16:51होमपेज › Belgaon › हिंडलगा कारागृहातील १२ कैदी सुटणार

हिंडलगा कारागृहातील १२ कैदी सुटणार

Published On: Aug 11 2018 1:19AM | Last Updated: Aug 10 2018 11:25PMबेळगाव : प्रतिनिधी

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील कारागृहांमध्ये विविध प्रकरणांत शिक्षा भोगणार्‍या 93 कैद्यांच्या सुटकेला राज्य मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दिला आहे. यामुळे सद्वर्तनी कैद्यांना याचा लाभ होणार आहे. हिंडलगा कारागृहातील 12 कैदी सुटणार आहेत. 

सदर प्रस्ताव राज्यपालांकडे पाठविण्यात येणार असून त्यांच्या सहमतीकडे कैद्यांचे लक्ष लागून राहिले आहे. राज्यातील विविध कारागृहांमध्ये विविध प्रकरणात शिक्षा भोगणार्‍या कैद्यांना त्यांच्या सद्वर्तनावरुन सुटका केली जाते. जेलमध्ये शिक्षा भोगून त्यांच्यात झालेला बदल व त्यांच्या वर्तनात झालेली सुधारणा लक्षात घेऊन त्यांची शिक्षा कमी करण्याची शिफारस केली जाते. कारागृह सल्‍लागार समितीच्या निर्णयावरुन कैद्यांची निवड केली जाते. त्यांची शिक्षा कमी करुन त्यांच्या सुटकेची शिफारस केली जाते. त्यानुसार सदर प्रस्ताव कारागृह अधीक्षकांकडून राज्य  गृहखात्याकडे पाठविला जातो. त्यानुसार राज्यभरातील कारागृहात विविध प्रकरणांत शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या सुटकेसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता.

यानुसार राज्य मंत्रिमंडळात यावर चर्चा करण्यात आली आहे.  राज्यातील कारागृहांमधील 93 कैद्यांची सुटका करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रस्ताव राज्य सरकारकडून लवकरच राज्यपालांकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हिंडलगा कारागृहात शिक्षा भोगणार्‍या व वर्तन सुधारलेल्या 12 कैद्यांच्या सुटकेचा प्रस्ताव कारागृह अधीक्षकांनी राज्य सरकारकडे पाठविला आहे. त्यामधील किती कैद्यांची सुटका होणार हे पाहावे लागणार आहे.

हिंडलगा कारागृहातील वर्तन सुधारलेल्या 12 कैद्यांच्या सुटकेचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत 93 कैद्यांच्या सुटकेचा निर्णय घेण्यात आला आहे. याला राज्यपालांची सहमती आवश्यक आहे. त्यानंतरच किती कैद्यांची सुटका होणार हे स्पष्ट होईल.  - टी. पी. शेषा, कारागृह अधीक्षक, हिंडलगा