Mon, Apr 22, 2019 03:43होमपेज › Belgaon › ‘त्या’ १२ जणांची बांगलादेशात रवानगी

‘त्या’ १२ जणांची बांगलादेशात रवानगी

Published On: Dec 03 2017 1:09AM | Last Updated: Dec 02 2017 11:17PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

पुणे विमानतळावर संशयास्पदरित्या सापडलेल्या महंमद अल अमीन याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर पुणे पोलिसांनी बेळगावात बेकायदेशीररित्या राहणार्‍या बांगलादेशी घुसखोरांची माहिती उघड केली होती. 6 महिन्यांच्या कसून चौकशीनंतर बेळगावात बेकायदेशीररित्या वास्तव्य केलेल्या 12 जणांना बांगलादेशात पाठविण्यात आले. 

2 मे रोजी पुणे पोलिसांनी महंमद अल अमीन याला अटक करून बेळगाव पोलिसांच्या ताब्यात दिले होते. अमीन याच्याकडे सापडलेल्या बनावट कागदपत्रांतून बेळगावात बेकायदेशीररित्या वास्तव्य केलेल्या बांगलादेशी घुसखोरांची माहिती उघड झाली होती.   

हिवाळी अधिवेशनात राज्यातील बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा चर्चेला आला होता. बेळगावात वास्तव्य केलेल्या बांगलादेशींविरोधात कोणती कारवाई केली जाणार, असा मुद्दा भाजपकडून उपस्थित करण्यात आला  होता. त्यामुळे बेळगावातील बांगलादेशी घुसखोरांविरोधात कारवाईसाठी माळमारुती पोलिसांनी लगबग चालविली होती. 

दरम्यान, माळमारुती पोलिस ठाण्याचे पोलिस उपअधीक्षक महांतेश्‍वर जिद्दी व सहकार्‍यांनी बेळगावातील बांगलादेशी घुसखोरांसंदर्भात अंतर्गत सुरक्षा विभागाला माहिती दिली. त्यानंतर 12 बांगलादेशी घुसखोरांना परत पाठविण्याबाबत कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यात आली. शनिवारी सकाळी अंतर्गत सुरक्षा विभागाचे अधिकारी त्या 12 बांगलादेशी घुसखोरांना घेऊन कोलकात्याला रवाना झाले आहेत. त्या 12 जणांना कोलकात्यानजीकच्या सीमारेषेवर बांगलादेशी पोलिसांकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याचे महांतेश जिद्दी यांनी सांगितले.