Thu, Jul 18, 2019 17:22होमपेज › Belgaon › बैलगाडी स्पर्धांतून पटकावले १२ लाख!

बैलगाडी स्पर्धांतून पटकावले १२ लाख!

Published On: Aug 28 2018 1:23AM | Last Updated: Aug 27 2018 11:15PMबेळगाव : प्रतिनिधी

बेकिनकेरे (ता. बेळगाव) येथील शिवाजी लक्ष्मण भोगण या पंचवीस वर्षीय तरुणाने बैलांविना बैलगाडी ओढण्याच्या स्पर्धेत वेगळेच कौशल्य प्राप्त केले आहे. गेल्या आठ वर्षात त्याने दोनशेहून अधिक बैलगाडी ओढण्याच्या स्पर्धेतून 12 लाखांहून अधिक रुपयांची बक्षिसे कमावून वेगळाच दबदबा निर्माण केला आहे. 

शिवाजीचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. शालेयस्तरावर कुस्ती स्पर्धेसह कबड्डीत त्याने अनेक प्रमाणपत्रांवर आपले नाव कोरले आहे. यानंतर मात्र रिकामी बैलगाडी ओढण्याची कसब मिळविली. बेळगाव, खानापूरसह चंदगड, गडहिंग्लज तालुक्यातील अनेक स्पर्धांमध्ये जाईल तिथे त्याचा प्रथम क्रमांक ठरलेला असतो. 

वर्षाकाठी साधारण 30 हून अधिक स्पर्धा होतात.  प्रथम क्रमांकासाठी 10 हजार ते  15 हजार रुपयांपर्यंत बक्षिसे वा महागडा मेंढा बक्षीस म्हणून दिला जातो. यामधून शिवाजी वर्षाला दोन ते तीन लाख रुपये मिळवतो. छंद, आवड म्हणून जडलेली ही स्पर्धा त्याचे करिअरच बनले आहे. बेळगाव परिसरात 20 वर्षापासून रिकामी बैलगाडी वा गाडीमध्ये 50 किलो वाळूचे पोते ठेवून ओढण्याच्या स्पर्धा होत असतात.  

2010 पासून तो स्पर्धेत भाग घेत आहे. गेल्या आठ वर्षात त्याने 300 हून अधिक स्पर्धांतून 12 लाखांहून अधिक रुपयांची बक्षिसे व मेंढे मिळवले आहेत. संतिबस्तवाड येथे एका मिनिटात त्याने एक हजार फुटापर्यंत बैलगाडी ओढून कमाल केली आहे. परिसरात पैलवान म्हणून ओळख निर्माण केली आहे. 

ही कला गावात जोपासण्यासाठी शिवाजी पुढाकार घेऊन अनेक वर्षे स्पर्धा भरवत आहे.  त्याला वडील लक्ष्मण भोगण,  पत्नी  अक्षता, भाऊ ज्ञानेश्‍वर, आई लक्ष्मी यांचे प्रोत्साहन लाभले. त्याला पैलवान कल्लाप्पा भोगण, कृष्णा हुंदरे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.