Sun, Jun 16, 2019 12:15
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › काँग्रेसच्या सार्‍या आमदारांना पुन्हा ‘हात’

काँग्रेसच्या सार्‍या आमदारांना पुन्हा ‘हात’

Published On: Mar 24 2018 1:46AM | Last Updated: Mar 22 2018 10:34PMबेळगाव : प्रतिनिधी

जिल्ह्यातील काँग्रेसच्या सार्‍या विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्याचे निश्चित झाले आहे. तशी माहिती पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनीच दिली आहे. काँग्रेसचे बेळगाव जिल्ह्यात एकूण सहा विधानसभा आमदार आहेत.

काँग्रेसचे राज्यात एकूण 122 आमदार असून, त्यापैकी 112 आमदारांना पुन्हा उमेदवारी मिळणार आहे. केवळ 10 आमदारांना आरोग्याच्या कारणास्तव उमेदवारी दिली जाणार नाही. त्या जागी त्या आमदारांचे कुटुंबीय किंवा त्यांनी सुचवलेल्या नेत्याला उमेदवारी दिली जाईल. मात्र उर्वरित 112 आमदारांची उमेदवारी निश्चित आहे. त्यात बेळगाव जिल्ह्यातील सहा आमदारांचा समावेश आहे.

बेळगाव उत्तर, यमकनमर्डी, गोकाक, चिक्कोडी, कित्तूर,  रामदुर्ग या मतदारसंघांत काँग्रेसचे आमदार आहेत. या सहाही मतदारसंघातील आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली जाईल, असे रमेश जारकीहोळी यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. जिल्ह्यात एकूण 18 विधानसभा मतदारसंघ असून, 10 मतदारसंघांमध्ये भाजपचे तर दोन मतदारसंघांमध्ये म. ए. समितीचे आमदार आहेत. काँग्रेसचे आमदार असलेले सहा मतदारसंघ वगळता उर्वरित 12 मतदारसंघांत अनेक जण इच्छुक आहेत. त्याशिवाय आमदार असलेल्या मतदारसंघांमध्येही अनेक जण उमेदवारीसाठी इच्छुक असल्याने काही विद्यमान आमदारांचा पत्ता कट होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. तिला पूर्णविराम देताना जारकीहोळी यांनी सहाही आमदारांची उमेदवारी निश्चित असल्याचे सांगितले.

सहा काँग्रेस, 10 भाजप, 2 समिती

बेळगाव जिल्ह्यात एकूण 18 विधानसभा आमदार असून, पैकी भाजपचे आमदार 10, म. ए. समितीचे दोन तर काँग्रेसचे सहा आमदार आहेत. सहा आमदार वगळता उर्वरित 12 मतदारसंघात काँग्रेसची चाचपणी सुरू आहे. 

विद्यमान काँग्रेस आमदार

बेळगाव उत्तर -  फिरोझ सेठ
यमकनमर्डी  - सतीश जारकीहोळी
गोकाक  - रमेश जारकीहोळी
चिकोडी-सदलगा   - गणेश हुक्केरी
कित्तूर -   डी. बी. इनामदार
रामदुर्ग -  अशोक पट्टण

 

Tags : belgaon, belgaon news, Assembly Elections, Congress, MLA, Candidates, nomination,