Tue, Jul 16, 2019 14:12होमपेज › Belgaon › मुरगूड रोडवर होणार 10 हजार रोपांची लागवड

मुरगूड रोडवर होणार 10 हजार रोपांची लागवड

Published On: Jun 04 2018 1:03AM | Last Updated: Jun 03 2018 10:34PMनिपाणी : प्रतिनिधी

एका तपानंतर निपाणी-चिकोडी रस्त्याचा वनवास संपला. या रस्त्याशेजारी  वनखात्याकडून 10 हजार 120 रोपांची लागवड करण्यात येणार आहे. त्यामुळे पुन्हा निपाणी-मुधोळ रस्ता प्रवशांना सावलीचा आधार देण्यासाठी सज्ज होणार आहे. कर्नाटक हद्द सुरू होणार्‍या लिंंगनूरपासून झाडे लावण्याचे काम वनखात्याने सुरू केल्याने प्रवाशांतून समाधान व्यक्त होत आहे.

चिकोडी तालुक्यातील प्रादेशिक वनखात्याच्यावतीने यंदाच्या पावसाळ्यात लागवड करण्यासाठी विविध प्रकारची 1 लाख 18 हजार रोपे तयार करण्यात आली आहेत. तालुक्यातील जैनापूर, चिंचणी येथील वनखात्याच्या रोपवाटिकेत ही रोप तयार केली आहेत.  पाऊस सुरु होताच रोपांचे वितरण करण्याचा आराखडा तयार केला आहे.

वास्तविक ही झाडे आठ ते दहा वर्षापूर्वी लावणे गरजेचे होते. गेल्या 13 ते 14 वर्षापूर्वी रस्ता रूंदीकरण करणार म्हणून हजारो झाडाची कत्तल करण्यात आली होती. मात्र तेव्हापासून रस्त्याचेही आणि झाडे लावण्याचेही काम खोळबंले होते. रस्ता होणार झाडे लावणार, अशीच चर्चा होताना दिसत होती. मात्र गेल्या वर्षभरात रस्ता पूर्ण झाला आणि आता झाडेही लागणार अशी आशा होती. ती पूर्ण झाली असून वनखात्याने झाडे लावण्याचे काम जोमाने सुरू केले आहे. ही झाडे अनेक प्रकारची असून या भागात पिंपळ आणि वडांच्या झाडांचे प्रमाण जास्त आहे. ही झाडे सावली निर्माण करण्याबरोबर निसर्ग वाचविण्यासाठी चांगली उपयोगी पडतील. 

यासाठी वनखात्याबरोबर नागरिकांनीही ही जतन करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. वनखाते झाडे लावल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे अनेक ठिकाणी निदर्शनास येत असल्याने ती जतन करण्याची जबाबदारी वनखात्याकडेच असणे गरजेचे आहे