Thu, Jul 18, 2019 20:44होमपेज › Belgaon › काँग्रेसच्या १० आमदारांचा पत्ता होणार कट

काँग्रेसच्या १० आमदारांचा पत्ता होणार कट

Published On: Mar 20 2018 1:47AM | Last Updated: Mar 20 2018 12:16AMबंगळूर : प्रतिनिधी

आगामी निवडणुकीत प्रत्येक पक्षाकडून उमेदवारी कुणाला मिळणार, याचीच उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे. उमेदवारी कुणाला मिळणार हे अद्याप काँग्रेस, भाजपने ठरवले नाही. मात्र किमा 10 आमदारांना काँग्रेसकडून उमेदवारी दिली जाणार नाही, असे निश्चितपणे मानले जाते. आरोग्याच्या कारणामुळे या 10 जणांऐवजी पर्यायी उमेदवारांचा शोध सुरू आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बदामी, गुलबर्गा ग्रामांतर, बेलूर, कोळ्ळेगल यासह 10 मतदारसंघात काँग्रेसकडून पर्यायी उमेदवारांचा शोध सुरू आहे. या मतदारसंघांतील आमदार आजारी असल्याने त्यांना निवडणुकीची दगदग सोसवणार नाही, परिणामी निवडून येण्याची शक्यता कमी आहे, असा अंदाज काँग्रेसचा आहे. 

पर्यायी उमेदवार शोधतानाही त्यांच्याच कुटुंबातील सदस्याचा आधी विचार होणार नाही. ते शक्य न झाल्यास या विद्यमान आमदारांनी सुचवलेल्या नेत्याला उमेदवारी दिली जाईल, असेही मानले जाते.
महत्त्वाचे म्हणजे या 10 आमदारांव्यतिरिक्त इतर 112 काँग्रेस आमदारांचे तिकीट निश्चित आहे. काँग्रसचे विधानसभेत 122 आमदार आहेत. 10 जणांचे तिकीट कापले गेल्यानंतर तेथे त्याच ताकदीचे नेते काँग्रेस शोधत आहे.

दरम्यान, धजदमधून आलेले 7 आमदार आणि भाजपमधून आलेले दोन बंडखोर आमदार यांचीही व्यवस्था काँग्रेसला करायची आहे. अर्थात हे नऊ जण त्यांच्या त्यांच्या सध्याच्याच मतदारसंघांत लढतील. त्यामुळे त्यावर काँग्रेसला जास्त डोकेफोड करावी लागणार नाही. या 10 जणांच्या जोरावरच काँग्रेसला विधानसभेतील संख्याबळ वाढवण्याचा विश्वास आहे. 

सध्या भाजपचे संख्याबळ 41 असून,निदजचे संख्याबळ 44 वरून 37 वर आले आहे. निजदचे 7 आमदार काँग्रेसमध्ये 25 मार्चला प्रवेश करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्नाटकाचे कितीही दौरे केले तरी त्यांना काँग्रेसला सत्तेवरून हटवता येणार नाही, असे वेळोवेळच्या सर्वेक्षणांनीही म्हटले आहे. काँग्रेसच्या अंतर्गत सर्वेक्षणाचा अहवालही असाच आहे. मात्र, काही जागा घटतील, असा अंदाज त्यात वर्तवण्यात आला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्यांना मात्र जागा वाढण्याचा विश्वास आहे.