Thu, May 23, 2019 04:55होमपेज › Belgaon › जिल्ह्यातील ‘मैत्री’ डॉक्टर वेतनाच्या प्रतीक्षेत ...

जिल्ह्यातील ‘मैत्री’ डॉक्टर वेतनाच्या प्रतीक्षेत ...

Published On: Feb 01 2018 1:42AM | Last Updated: Jan 31 2018 11:30PMबेळगाव : प्रतिनिधी

पशुसंगोपन खात्यामध्ये मागील अनेक वर्षापासून पशुवैद्यकीय विभागात डॉक्टरांच्या जागा रिक्त असल्याने पशुपालन करणार्‍या नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत होते. यावर उपाय म्हणून राज्य सरकारने ‘मैत्री’ योजनेअंतर्गत पशुवैद्यकीय प्रशिक्षणार्थीं डॉक्टरांची नेमणूक केली आहे. मात्र सदर 47 जणांचे मागील चार महिन्यांपासून वेतन थकले आहे. 

पशुसंगोपन खात्याकडून अनेक वर्षापासून रिक्त जागा भरल्या नसल्याने पशुवैद्याधिकार्‍यांची कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे पशुसंगोपन करणार्‍या शेतकर्‍यांना व दुग्ध व्यवसाय करणार्‍यांना याचा  फटका बसत आहे. त्यांना खासगी पशुवैद्याधिकार्‍यांवर अवलंबून राहावे लागत आहे. या बाबत अनेक भागातून तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या. डॉक्टरांची मागणी करण्यात आली होती. 
यामुळे सरकारने मैत्री योेजनेअंतर्गत ग्रामीण भागात पशुसंगोपन खात्याकडून सेवा देण्यास मदत व्हावी, या उद्देशाने डेअरी कोर्स केलेल्या व यामध्ये अनुभव असलेल्या खासगी पशु वैद्यांची नेमणूक केली आहे. 

या योजनेतून सदर प्रशिक्षणार्थीना तीन महिन्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रशिक्षण पूर्ण झालेल्यांची जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये व आवश्यक ठिकाणी नेमणूक केली आहे. सेवेत डॉक्टर कार्यरत होऊन चार महिन्याचा कालावधी उलटला तरी अद्याप त्यांना वेतन मिळालेले नाही.यामुळे त्यांची गोची झाली आहे. याबरोबरच सेवा देण्यास सोयीची व्हावे यासाठी एआय कीट पुरविण्यात येणार होते.मात्र अद्याप कीटही वितरीत करण्यात आलेले नाही. यामुळे  डॉक्टरांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्याकडून चार महिन्याचे वेतन आणि आवश्यक  सुविधा देण्याची मागणी करण्यात येत आहे.