होमपेज › Belgaon › औरदबैल येथील २५ मुले शिक्षणापासून वंचित

औरदबैल येथील २५ मुले शिक्षणापासून वंचित

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

खानापूर : वासुदेव चौगुले

अन्न, वस्त्र, निवारा यासह शिक्षण आणि आरोग्य या आजघडीच्या मूलभूत गरजा बनल्या असताना तालुक्यातील अनेक दुर्गम वाडी-वस्त्यांना शिक्षण, आरोग्य आणि संपर्काच्या साधनांचा आजही स्पर्श झाला नसल्याचे वास्तव चित्र दिसून येते. बाळगुंदजवळील औरदबैल येथील गवळी व माकडमारी समाजाची अवस्थाही अशीच असल्याने तेथील 25 हून अधिक मुलांना शिक्षणाअभावी जंगलातच वणवण करत दाहीदिशा फिरण्याची वेळ आली आहे.

लोंढा जि. पं. क्षेत्रातील बाळगुंद गावापासून अडिच किमी अंतरावर चोहोबाजूने घनदाट जंगलाने वेढलेल्या औरदबैल येथे जवळपास दिडशे लोकवस्तीच्या या तांड्यावर गवळी समाजाचे लोक वास्तव्य करुन आहेत. येथून जवळच माकडमारी समाजाच्या सुमारे वीस कुटुंबांचे वास्तव्य आहे. दिवसभर राना-वनात भटकून कंदमुळे गोळा करणे, माकडमारी करुन जमलेल्या सामग्रीवर गुजराण करणे. हा त्यांचा नित्यक्रम आहे. तर गवळीवाड्यावरील लोक पशुपालनातून संसारगाडा हाकत आहेत.

काही वर्षांपूर्वी झोपडपट्टीमध्येच या समाजाला आदिवासीसारखे दिवस काढावे लागत होते. माजी जि. पं. सदस्य बाबुराव देसाई यांनी पाणी व वीजपुरवठ्याची सोय करुन दिल्याने जीवनातील अंधार दूर झाला असला तरी अज्ञानाचा अंधकार अद्यापही तसाच आहे. वस्तीवर शिक्षणाची सोय नसल्याने लहान मुले दिवसभर जंगलात भटकंती करताना दिसून येतात. अंगणवाडीच्या अभावामुळे शाळेची लहानपणापासूनच ओढ जाणवत नसल्याने कळू लागल्यावर नियमित शाळेला जाण्यासही मुलांमध्ये निरुत्साह दिसून येतो. शिक्षणाची गोडी लागण्यासाठी याठिकाणी त्वरित अंगणवाडी केंद्र सुरु करण्याची आवश्यकता आहे. याठिकाणी किमान पूर्व प्राथमिक शिक्षणाची तरी सोय झाल्यास मुलांमध्ये शाळेची आवड निर्माण होऊन  ती नियमितपणे शाळेला जाऊ लागतील, असा पालकांना विश्‍वास आहे.