‘सूक्ष्म’जंतूचे ‘महा’राक्षस 

Last Updated: Mar 21 2020 10:39PM
Responsive image


राजीव मुळ्ये, ज्येष्ठ पत्रकार

कोरोना विषाणूमुळं सगळीकडे भीतीचं वातावरण पसरलंय. वस्तुतः, इतर आजारांमुळं मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या कोरोनाबाधितांच्या तुलनेत किती तरी अधिक आहे. मात्र, हा वेगानं पसरणारा जीवघेणा विषाणू असल्यामुळं युद्धपातळीवर खबरदारी घेतली जात आहे. संसर्गजन्य आजारांचा हल्ला होताच सर्वत्र अशीच घबराट पसरते. कोरोना हा अशी भीती निर्माण करणारा पहिलाच महाराक्षस नव्हे. इतिहासात डोकावलं, तर अशा किती तरी महाराक्षसांशी जगाला लढावं लागलं आहे.

वातावरण भीतीने व्यापलेलं. कुणाशी हस्तांदोलन करून ‘थँक्स’ म्हणण्याची चोरी. जवळपास कुणी शिंकलं तरी अंगावर काटा. घरात कोणाला ताप आला, तरी संपूर्ण कुटुंबाला घाम फुटणं. घरातून बाहेर पडण्यासाठी पायात चप्पल सरकवताना मनात असंख्य शंकांचं काहूर... असले विचित्र दिवस सध्या आपण अनुभवत आहोत. ‘कोव्हिड-19’ अर्थात कोरोना नावाचा महाराक्षस प्रत्येकाच्या पोटात गोळा आणणारा ठरला आहे. कुठे पेट्रोल पंप बंद होणार असल्याची अफवा उठून पंपांवर गर्दी झाली, तर कुठे पोल्ट्रीतल्या कोंबड्या फुकट वाटण्याची वेळ आली. अफवा पसरवणार्‍यांबरोबरच संकटात संधी शोधणारेही सरसावले. मास्क आणि सॅनिटायझरचा काळाबाजार झाला. वापरलेले मास्क पुन्हा पॅक करून विकण्याचे प्रयत्न झाले.

‘विषाणूंशी लढणारी गादी’ अशी जाहीरातबाजी करणार्‍यांना चाप लावण्याचं काम ग्राहक पंचायतीला करावं लागलं. या वातावरणाला युद्धसद़ृश परिस्थिती म्हणणं फारसं अप्रस्तुत ठरणार नाही. सरकारी यंत्रणाही युद्धपातळीवर काम करते आहे. आयसोलेशनमध्ये ठेवलेल्या रुग्णांना आपण जबरदस्तीनं डांबलेले ‘युद्धकैदी’ असल्याचा भास होत असेल. काहींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, यावरून तसंच वाटतं. जीवघेण्या संसर्गजन्य आजारांची साथ यापूर्वी आलीच नाही, असं नाही; पण कोरोनाची व्याप्ती आणि प्रसाराचा वेग प्रचंड आहे. ब्रिटिशांच्या आमदनीत पुण्यात प्लेग आला होता, तेव्हा लोकांनी काय परिस्थिती अनुभवली असेल, याचा अंदाज सध्याच्या वातावरणावरून येतो. त्यावेळी पोलिस घरात घुसून माणसांसह घरातलं सामानसुमानही जबरदस्तीनं बाहेर काढत होते. कोरोनाच्या साथीनं अजून तरी इतकी भयानक परिस्थिती निर्माण केलेली नाही. कोरोनाच्या निमित्तानं थोडी भूतकाळावर नजर फिरवूया... 

स्पॅनिश फ्लू : जगाला हादरवणारा पहिला सूक्ष्मजीव पहिल्या महायुद्धापाठोपाठ बाहेर पडला आणि ‘स्पॅनिश फ्लू’ नावाचा जीवघेणा आजार घेऊन आला. महायुद्धातून जग सावरण्यापूर्वीच या आजाराचा फैलाव सैनिकांच्या प्रशिक्षण केंद्रांमधूनच सुरू झाला. विशेषतः, फ्रान्सच्या सीमेजवळ असलेल्या खंदकांमधील अस्वच्छतेमुळं ‘स्पॅनिश फ्लू’ वेगानं पसरला. नोव्हेंबर 1918 मध्ये युद्ध संपलं; पण घरी परतणार्‍या सैनिकांनी हा विषाणू सोबत आणला. ‘स्पॅनिश फ्लू’मुळं झालेल्या मृत्यूंचा आकडा सुमारे पाच ते दहा कोटींच्या घरात असल्याचं सांगितलं जातं. या आजारानंतर जगात अनेक संसर्गजन्य आजार पसरल्याची उदाहरणं आहेत; पण ‘स्पॅनिश फ्लू’इतका घातक आजार जगाने नंतर पाहिला नाही. ‘स्पॅनिश फ्लू’ आला तेव्हा विमान प्रवासाची सुविधा नुकतीच सुरू झाली होती. त्यामुळं तो जगभर फारसा पसरला नाही. अनेक ठिकाणी पोहोचायला ‘स्पॅनिश फ्लू’च्या विषाणूंना काही महिने लागले. अलास्कासारख्या देशात तो पोहोचलाच नाही. कारण, आता कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपण शाळा-कॉलेज बंद करणं, गर्दी नियंत्रित करणं असे जे उपाय करतो आहोत, ते अलास्कातील लोकांनी त्यावेळी अवलंबिले होते. मुख्य शहरांपासून ग्रामीण भागांत पोहोचणारे रस्तेही बंद केले होते. जगातील सर्वाधिक संहारक विषाणू म्हणून ‘स्पॅनिश फ्लू’ची नोंद झाली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे, युद्धातून सहिसलामत बचावलेले अनेक जवान ‘स्पॅनिश फ्लू’पासून बचावले नाहीत. तापापासून बचाव करण्याची शरीराची विशिष्ट क्षमता असते. परंतु, या आजारात विषाणू इतक्या वेगानं हल्ला करीत असे की, ही क्षमता पराभूत होऊन फुफ्फुसात पाणी भरत असे. विशेष म्हणजे, वृद्धांना तरुणांच्या तुलनेत ‘स्पॅनिश फ्लू’ची लागण कमी प्रमाणात झाली होती. कारण, ‘स्पॅनिश फ्लू’च्या किती तरी आधी 1830 मध्ये अशाच स्वरूपाचा एक ताप त्यांनी अनुभवला होता आणि त्यांची प्रतिकारकशक्ती वाढलेली होती. 

प्लेग : चौदाव्या शतकापासूनचा इतिहास असलेला प्लेग हा सर्वात जुना, अनेकांचे जीव घेणारा संसर्गजन्य आजार. उंदरांमुळे पसरलेल्या या आजाराला ताऊन, ब्लॅक डेथ, पेस्ट आदी नावांनी संबोधले गेले. सन 1500 ते 1720 पर्यंत जपान, भारत, तुर्कस्तान असा प्रवास करीत प्लेग 1896 मध्ये रशियात पोहोचला. 1898 मध्ये अरब देश, ऑस्ट्रिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि ऑस्ट्रेलियात प्लेगने हाहाकार उडवून दिला. जगभरात 68 हजार 596 जणांना प्लेग झाल्याचे सुरुवातीला निष्पन्न झाले होते. मात्र, हा अतिघातक आजार अखेरीस जगभरातील 87 हजार 500 पेक्षा अधिक लोकांचा बळी घेतल्यानंतरच शांत झाला. प्लेगच्या काळातच म्हणजेच आजपासून 123 वर्षांपूर्वी 1897 मध्ये भारतात महामारीसंदर्भातील कायदा अस्तित्वात आला. साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक असणार्‍या सर्व तर्‍हेच्या उपाययोजना करण्यासाठी या कायद्याची निर्मिती करण्यात आली. 

कॉलरा : 1820 मध्ये कॉलराचं महासंकट आशियाई देशांवर चाल करून आलं. या आजाराने जपान, आखाती देश, भारत, बँकॉक, मनिला, जावा, ओमान, चीन, मॉरिशस, सीरिया आदी देशांना विळखा घातला. कॉलरामुळे एकट्या जावामध्ये एक लाखाहून अधिक बळी गेले. सर्वाधिक मृत्यू इंडोनेशिया, थायलंड आणि फिलिपिन्समध्ये झाले. 

एन्फ्लुएन्जा : 1918 मध्ये पसरलेला हा आजार विसाव्या शतकातील सर्वाधिक घातक मानला गेला. एच1-एन1 नावाच्या विषाणूमुळे संक्रमित होणार्‍या या आजाराचा प्रसार नक्की कुठून सुरू झाला, हे निश्चितपणे सांगता येत नाही. या आजारामुळे त्यावर्षी पाच वर्षांखालील लहान मुलांचा बळी घ्यायला सुरुवात केल्यामुळे घबराट उडाली होती. परंतु, पुढे 20 ते 25 वर्षे वयोगटातील तरुणांना आणि 65 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या वृद्धांनाही या आजारानं विळखा घातला. जगातील अनेक देशांत पसरलेल्या एन्फ्लुएन्जाने एकंदर दोन ते पाच कोटी लोकांचा बळी घेतला असावा, असा अंदाज आहे. 

इबोला : अगदी अलीकडेच म्हणजे 2014 ते 2016 या कालावधीत इबोलाचा बराच बोलबाला होता. मध्य आफ्रिकेतील काही गावांमधून या विषाणूचा प्रसार सुरू झाला. खरं तर 1976 मध्येच या विषाणूचा शोध लागला होता. परंतु, त्यानंतर 2014 मध्ये या विषाणूने केलेला हल्ला सर्वात मोठा होता. गिनीमधून पसरू लागलेले विषाणू त्यालगतच्या सिएरा लिओन आणि लायबेरियापर्यंत पसरले. इबोलाची लागण झालेल्यांपैकी 50 टक्के लोकांचा मृत्यू झाला, असं अमेरिकेतील तज्ज्ञांचं मत आहे. केवळ संपर्कामुळं पसरणारा इबोला फाटलेली त्वचा, डोळे, नाक आणि तोंडावाटे एका शरीरातून दुसर्‍या शरीरात शिरकाव करत असल्यामुळं लोकांची धांदल उडाली. म्हणजेच सध्याच्या कोरोना विषाणूपेक्षाही इबोला अधिक सहजपणे फैलावत होता. या आजारामुळं 2 हजार 249 लोकांचा मृत्यू झाला होता.

स्वाईन फ्लू : स्वाईन फ्लूचा प्रसार 2009 च्या एप्रिल महिन्यात सर्वप्रथम झाला. हा एन्फ्लुएन्जाप्रमाणेच एच1-एन1 विषाणूचा परिणाम होय. उत्तर अमेरिकेत त्यावर्षीच्या हिवाळ्यात स्वाईन फ्लूचा प्रसार प्रचंड वेगानं झाला आणि त्यावरील लस जेव्हा अस्तित्वात आली, तेव्हा आजाराचा फैलाव जवळजवळ थांबला होता. स्वाईन फ्लूमुळं संपूर्ण जगभरात झालेल्या मृत्यूंच्या संख्येबाबत 1 लाख 51 हजार 700 पासून 5 लाख 75 हजार 400 पर्यंत वेगवेगळी आकडेवारी सांगितली जाते. एका सर्वेक्षणानुसार, या आजारामुळं जीव गमावलेले बहुतांश लोक 65 वर्षांपेक्षा कमी वयाचे होते. या आजारात संक्रमित झालेल्या व्यक्तींच्या मृत्यूचा दर 0.1 टक्का एवढा अल्प होता. मे 2010 नंतर आजाराचा फैलाव कमी होऊ लागला आणि ऑगस्ट 2010 मध्ये आजाराचा फैलाव थांबल्याची घोषणा जागतिक आरोग्य संघटनेनं केली होती.

एमईआरएस : मिडल ईस्ट रेस्परेटरी सिंड्रोम अर्थात एमईआरएस या संसर्गजन्य आजाराचा शोध प्रथम 2012 मध्ये लागला. त्यानंतर या आजारानं आजवर अनेक ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवली आहे. या आजाराची लागण झालेल्या रुग्णांपैकी 34 टक्के रुग्णांचा मृत्यू होतो, असं दिसून आलं आहे. परंतु, हा आजार कोरोनासारखा वेगानं पसरणारा नाही. आतापर्यंत या साथीनं 2 हजार 494 बळी घेतल्याची नोंद आहे. या आजाराचं वैशिष्ट्य म्हणजे, ज्याला लागण झाली, त्या व्यक्तीमुळं आणखी फक्त एकाच व्यक्तीला लागण होऊ शकते. 

झिका : ब्राझीलमध्ये 2015 मध्ये या आजाराची लागण सुरू झाली. त्यानंतर हा आजार दक्षिण आफ्रिका आणि प्रशांत महासागरातील अनेक बेटांवर पसरत गेला. या धोकादायक विषाणूमुळं कोरोनासारखीच त्यावेळीही जागतिक आरोग्य संघटनेनं जागतिक आरोग्य आणीबाणी जारी केली होती. मानवी स्नायूंवर थेट हल्ला चढवणारा हा विषाणू गर्भवती महिलांसाठी अधिक घातक ठरतो, असं दिसून आलं.

सार्स : 2003 मध्ये आलेल्या सार्स या घातक विषाणूजन्य आजारामुळे 8,000 लोक बाधित झाले होते आणि 774 जणांचा मृत्यू झाला होता. जागतिक आरोग्य संघटनेने सार्सच्या संक्रमणालाही ‘पॅनेडेमिक’ म्हणून घोषित केले होते. चीनमध्ये सार्सग्रस्तांचा आकडा 5,000 च्या पुढे जाण्यास सहा महिन्यांचा काळ लागला होता. मात्र, कोरोनामुळे अवघ्या महिनाभरात 7,700 जणांना ग्रासले आणि या काळात 170 जणांचा मृत्यूही झाला.