कहाणी भविष्यातल्या माणसाची!

Published On: Oct 06 2019 1:29AM | Last Updated: Oct 05 2019 8:42PM
Responsive image


महेश कोळी, संगणक अभियंता

विकास ही सातत्यपूर्ण प्रक्रिया असून, हे चक्र नैसर्गिकरीत्या सुरूच असते. परंतु, गेल्या काही दशकांत विज्ञान आणि तंत्रज्ञानात झालेल्या क्रांतिकारी बदलांमुळे विकासाची प्रक्रिया नैसर्गिक प्रक्रियेपेक्षा अधिक गतिमान झाली आहे. भविष्यातील दुनिया वेगळीच असेल, असा अंदाज शास्त्रज्ञांनी याच आधारावर बांधला आहे. भविष्यातील माणसाचे स्वरूप आणि त्याच्याजवळील शक्ती कशा असतील, याचा अंदाजही आपण आता बांधू शकत नाही. तरीसुद्धा भविष्यातला माणूस नेमका कसा असेल, याचे काही ठोकताळे बांधता येतात...

भाजी मंडईचे 1970-80 च्या दशकातले स्वरूप आणि आजचे स्वरूप याची तुलना केल्यास केवळ न्यूयॉर्क, पॅरिस किंवा लंडनच नव्हे, तर नवी दिल्ली, मुंबई, लुधियाना, मेरठ अशा ठिकाणीही वेगळे चित्र दिसते. 1970-80 च्या दशकात लाल, पिवळ्या आणि निळसर रंगाची ढबू मिरची कुठे होती? 1970-80 च्या दशकातील भाजी मंडईत चार प्रकारचे टोमॅटो, पाच-सहा प्रकारची वांगी, अनेक जातींची बोरे दिसत होती का? हे प्रश्न उपस्थित करण्याचा हेतू असा की, गेल्या चार-पाच दशकांत भाजी मंडईत मिळणार्‍या भाज्यांच्या प्रकारांमध्ये खूप फरक झाला आहे. प्रत्येक भाजीच्या वेगवेगळ्या जाती उपलब्ध आहेतच; शिवाय विशिष्ट भाजीसाठी विशिष्ट हंगामापर्यंत करावी लागणारी प्रतीक्षाही संपली आहे. आज पूर्वीच्या तुलनेत प्रत्येक भाजीचे वेगवेगळे प्रकारच केवळ उपलब्ध आहेत असे नव्हे, तर त्या भाज्यांची उपयुक्तता, आकर्षकपणा आणि चवही बदलली आहे. प्रयत्नपूर्वक हे बदल करण्यात आले म्हणूनच आपल्या आहारात एवढे वैविध्य येऊ शकले. हे बदल केवळ भाज्यांच्याच बाबतीत घडले आहेत, असे नाही. सर्वच क्षेत्रांमध्ये गतिमान बदल झाले आहेत आणि होतच राहणार आहेत. हे बदल, हा विकास मानवी शरीराशी संबंधित बाबींमध्येही होत आहे. काही बदल नैसर्गिकरीत्या, तर काही बदल आपल्या प्रयत्नांमधून होत आहेत. 

आज माणूस जसा आहे, तसाच तो भविष्यात असेल, असे सांगता येत नाही. भविष्यातील माणसाच्या शरीरात अनेक यंत्रे अवयव बनून समाविष्ट झालेली असतील. या बदलाची सुरुवात तर आताच झाली आहे. रोबोटिक्स विषयाचे ब्रिटिश शास्त्रज्ञ यांनी आपल्या हाताच्या खालच्या बाजूला एक सेन्सर म्हणजेच एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस प्रत्यारोपित करून घेतला होता. मानवी रक्ताभिसरण संस्था एखाद्या बाह्य यंत्राशी कशी संगती साधू शकते किंवा मानवी शरीरातील विविध संस्था आणि यंत्र एकत्रितपणे काम करू लागली, तर त्यांचा एकमेकांना प्रतिसाद कसा असतो, हे त्यांना जाणून घ्यायचे होते. त्यांनाच जगातील पहिला ‘सायबोर्ग’ (अर्धमानव, अर्धयंत्र) मानले गेले आहे. आर्टिफिशियल इन्टेलिजन्स आणि रोबोटिक्सचे प्रणेते वारविक तर स्पष्ट शब्दांत असे सांगतात की, भविष्यातील माणूस आजच्यासारखा नक्कीच नसेल. वारविक हे सध्या कोव्हेन्ट्री विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. 

आपल्या पूर्वजांना शेपूट होते; परंतु कालांतराने ते नष्ट झाले, हे शाळेच्या पुस्तकात आपण सर्वांनी वाचले आहे. शेपूट नाहीसे होण्याचे कारण असे की, मानवाला त्याचा उपयोगच उरला नाही. उपयोगितेचा हाच सिद्धांत भविष्यात माणसाच्या अनेक अवयवांना लागू पडणार आहे. सध्याच्या जीवनशैलीस अनुरूप ज्या अवयवांची गरज भविष्यात आहे, अशा सर्व अवयवांच्या उपयोगितेलाही हाच सिद्धांत लागू होईल. उदाहरणार्थ, माणसाच्या दैनंदिन जीवनात वेगाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे विकासक्रमाचा अभ्यास करणार्‍या शास्त्रज्ञांना असे वाटते की, भविष्यात माणूस उडूही शकेल. अर्थात, शास्त्रज्ञांच्या या दाव्यामध्ये अनेक किंतु-परंतु असले, तरी माकडाच्या शेपटीच्या बाबतीत जितक्या आत्मविश्वासाने दावा केला जातो, तो पाहता भविष्यात माणूस उडूच शकणार नाही, असेही नाही. अर्थात, त्याला काही हजार वर्षे जावी लागतील, हेही ओघानेच आले. माणसाच्या क्रमिक विकासाचा इतिहास हाच या दाव्याचा आधार आहे. या इतिहासात निरुपयोगी अवयव नष्ट झाले आहेत आणि ज्यांची माणसाला गरज आहे, असे अवयव क्रमशः विकसित होत गेले आहेत. परंतु, भूतकाळात केवळ गरज हाच मुद्दा अधिक प्रभावी होता आणि भविष्यात विज्ञानाची त्याला जोड असणार आहे. गरजेप्रमाणे माणसाला उडण्यासाठी पंख देण्याचे काम विज्ञान करू शकते. याच आधारावर असा दावा केला जातो की, भविष्यात माणसाचा विकास कल्पनेच्या पलीकडचा असेल.

निसर्गाच्या विकासाचे चक्र सतत फिरत असते, असे सामान्यतः मानले जाते. या प्रक्रियेमुळेही माणसाचे रंग, रूप, आकार आणि हालचालींमध्ये कमालीचे बदल घडून येण्याची अपेक्षा शास्त्रज्ञांना आहे. ‘बीबीसी फ्यूचर सीरिज’च्या अंतर्गत प्रसिद्ध झालेल्या एका लेखानुसार, भविष्यात आपल्या परिसरात असे काही क्रांतिकारी बदल घडतील की, सध्या या पृथ्वीवर असलेला एकही जीव मूळ स्वरूपात दिसणार नाही. 1980 मध्ये डुगल डिक्सन या लेखकाने ‘आफ्टर मॅन ः अ झूलॉजी ऑफ द फ्यूचर’ नावाचे पुस्तक लिहिले होते. या पुस्तकात त्यांनी लाखो वर्षांनंतरच्या जगाची कल्पना रंगवली होती. ही कल्पना विश्वास ठेवण्यापलीकडची आहे. या पुस्तकात उडणारी माकडे किंवा ज्यावर शिकार स्वतःच येऊन बसेल, अशी चिमण्यांच्या आकाराची फुले आणि हवेतच शिकार करू शकणार्‍या उडत्या सापांचीही कल्पना त्यांनी केली आहे. सामान्य माणसाच्या नजरेतून या पुस्तकाकडे पाहिले असता, यात कविकल्पनेव्यतिरिक्त काहीही नाही. लेखकाच्या डोक्यात तयार झालेली ही निव्वळ कल्पना आहे. परंतु, संशोधकांच्या नजरेतून पाहिल्यास, भविष्यातील मानवी विकासाच्या आणि जगातील बदलांच्या द़ृष्टीने या पुस्तकात बरेच काही आहे.

क्रमिक विकास विषयातील तज्ज्ञ संशोधक जोनाथन लोसोस यांच्या मते, सुमारे 54 कोटी वर्षांपूर्वी जेव्हा कॅम्ब्रियन स्फोट झाला होता, तेव्हा पृथ्वीवर अनेक नवीन, अनोळखी, चित्रविचित्र जीव आले होते. या काळातील हॅलोसेंजिया नावाच्या एका प्राण्याचे जीवाश्म मिळाले आहेत. आपल्या पाठीच्या कण्यात हाडांचे जसे जाळे दिसून येते, तसे हाडांचे जाळे या प्राण्याच्या शरीरभर होते. भविष्यात काही असे नवीन जीवही तयार होण्याची शक्यता आहे. जोनाथन लोसोस हे ज्या कल्पनेंतर्गत अर्धमानवाचा उल्लेख करीत आहेत, ती बाब विज्ञानाच्या संदर्भात प्रथमच घडत असेल. परंतु, आपल्या पुराणकथांमध्ये अशा अर्धमानवाचे केवळ उल्लेखच नाहीत, तर त्याचे विस्तृत विवेचनही दिले आहे.

हिंदू पुराणकथांमध्ये तर अशा गोष्टींचे भांडारच आढळते. आपल्या पुराणकथांमध्ये अशा एकेका राक्षसाचे उल्लेख आले आहेत, ज्यांची आजच्या वेगाने विकसित होणार्‍या विज्ञानातही कल्पना केली जाऊ शकत नाही. रोमन आणि ग्रीक दंतकथांमध्येही अशा काही प्राण्यांचे उल्लेख आढळतात, जे जमिनीवर, पाण्यात आणि हवेत असे तिन्ही ठिकाणी संचार करू शकतात. थोडक्यात, गतिमान विकासाच्या अशा टप्प्यावर माणूस आज उभा आहे, जिथून पुढे त्याच्या शरीरात बदल घडण्याची शक्यता आहे. माणसाला एक नवी ओळख मिळण्याची चिन्हे आहेत. अर्थात, ही ओळख बनण्यासाठी दहा-वीस किंवा शे-दोनशे वर्षांची कालमर्यादा आखून दिली जाऊ शकत नाही. हे बदल भविष्यात केव्हाही घडू शकतील.