पृथ्वी नष्ट झाली तर...

Published On: Sep 08 2019 1:36AM | Last Updated: Sep 07 2019 8:33PM
Responsive image


प्रा. विजया पंडित

ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी परग्रहावर जीवन शोधण्याच्या प्रयत्नांकडे मानवी संस्कृतीच्या जतनांचे माध्यम म्हणून पाहिले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, अंतरिक्षातील ग्रहांच्या धडकेमुळे किंवा अणुयुद्धामुळे मानवी संस्कृती नष्ट होण्याची शक्यता असून, ती जतन करण्याच्या दृष्टीने परग्रहांवर जीवनाची शक्यता शोधणे आवश्यक आहे, जेणेकरून मानवजातीचे भविष्य सुरक्षित राहू शकेल. नुकत्याच झालेल्या काही संशोधनांनुसार परग्रहांवर पृथ्वीशी मिळतेजुळते आणि जीवनास पोषक वातावरण असण्याच्या शक्यतेला बळ मिळाले आहे.

जीवनाचा विकास आणि भरणपोषणासाठी ब्रह्मांडात सर्वात अनुकूल ग्रह म्हणजे आपली पृथ्वी. परंतु, तरीही पृथ्वीबाहेर अन्य ग्रहांवर पृथ्वीप्रमाणे जीवनास अनुकूल परिस्थिती आहे का, याचा शोध शास्त्रज्ञ नेहमीच घेत राहिले आहेत. पृथ्वीच्या आकाराचे काही बर्फाळ ग्रह असून, त्या ग्रहांवरील काही भाग मानवाला जगण्यास अनुकूल असू शकतो, असा दावा नव्याने झालेल्या एका संशोधनांती करण्यात आला आहे. अशा पूर्णपणे थंड झालेल्या ग्रहांवर वास्तव्य शक्य नाही, असेच शास्त्रज्ञ आजवर मानत होते; कारण तेथील महासागरही गोठलेल्या अवस्थेत आहेत आणि अतिरेकी थंडीमुळे तिथे जगणे शक्यच नाही; परंतु अत्याधिक थंड किंवा अत्याधिक उष्ण ग्रहांवर जगणे शक्यच नाही, या आजवरच्या समजुतीला नव्या संशोधनाने आव्हान दिले आहे. ‘जिओफिजिकल रिसर्च जर्नल’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या या संशोधनानुसार, बर्फाळ ग्रहांच्या भूमध्यरेषेजवळ जगण्यास अनुकूल तापमान असणे शक्य आहे. कॅनडातील टोरांटो विद्यापीठातील खगोल आणि भौतिकशास्त्रज्ञ एडिव्ह पॅरडाइज यांच्या मते, नव्या संशोधनात असे काही बर्फाळ ग्रह आढळले आहेत. पारंपरिक समजुतीनुसार या ग्रहांवर राहणे शक्य मानले जात नव्हते; परंतु कदाचित तेथे राहण्यायोग्य हवामान असू शकते, असे नवे संशोधन सांगते. एका तार्‍यापासून असलेल्या विशिष्ट अंतरामुळे अशा ग्रहांवर राहण्यायोग्य काही भाग असू शकतो. त्या भागात सामान्य तापमान आणि द्रवरूपात पाणी असू शकते.

आतापर्यंत झालेल्या संशोधनांमधून असे स्पष्ट झाले आहे की, आपल्या पृथ्वीवरसुद्धा दोन ते तीन वेळा हिमयुग अवतरले आहे; परंतु तरीही येथे जीवन टिकून राहिले. हिमयुगातही सूक्ष्म जीव बचावले. पॅरडाइज यांचे म्हणणे असे की, पृथ्वी हा हिमयुगातही राहण्यायोग्य ग्रह होता. जीवनाची निर्मिती येथे हिमयुगाच्या आधीच झालेली होती. हिमयुगाच्या नंतरही जीवन कायम राहिले. शास्त्रज्ञांनी बर्फाळ ग्रहांवर राहण्याजोग्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी कम्प्युटरच्या प्रोग्रामचा आधार घेतला. त्यात सूर्यप्रकाशाचे अस्तित्व आणि क्षेत्रांच्या आधारावर मॉडेल तयार करण्यात आले. ज्या गोष्टीकडे शास्त्रज्ञांनी सर्वाधिक लक्ष दिले ते म्हणजे कार्बन डाय ऑक्साइड वायू. या वायूमुळेच कोणत्याही ग्रहावर तापमान टिकून राहते आणि जलवायू परिवर्तनही होते. कार्बन डाय ऑक्साइडविना ग्रहांवरील महासागर गोठतात आणि निर्जीव बनतात. जेव्हा वायुमंडलात कार्बन डाय ऑक्साइडचा स्तर कमी होतो तेव्हा ग्रह ‘स्नोबॉल’ म्हणजेच बर्फाळ होऊन जातो; परंतु जेव्हा या ग्रहांवर सूर्यप्रकाश पडतो, तेव्हा या ग्रहांच्या भूमध्यरेषांच्या आसपासच्या क्षेत्रातील बर्फाचे पाणी बनण्याची शक्यता प्रबळ बनते. या आधारावरही असे म्हणता येते की, बर्फाळ ग्रहांवर जीवन असू शकते.

नासाच्या शास्त्रज्ञांनी नुकताच एक असा ग्रह शोधला आहे, जो राहण्यायोग्य असू शकतो. हा ग्रह आपल्या सूर्यमालेच्या बाहेरचा आहे. आपल्या पृथ्वीपासून हा सुमारे 31 प्रकाशवर्ष दूर आहे. या ‘सुपरअर्थ’ ग्रहाला ‘जीजे 357 डी’ असे नाव देण्यात आले आहे. ‘ट्रान्झिटिंग एक्सोप्लॅनेट सर्व्हे सॅटेलाइट’ (टीईएसएस) या ‘नासा’च्या अंतरिक्ष दुर्बिणीच्या मदतीने या वर्षाच्या प्रारंभी तो शोधून काढण्यात आला आहे. अमेरिकेच्या कॉर्नेल विद्यापीठात या ग्रहाविषयी संशोधन करणार्‍या गटाच्या सदस्या लिसा कल्टेनेगर यांच्या म्हणण्यानुसार, पृथ्वीच्या सर्वात जवळ असलेल्या ‘सुपरअर्थ’ ग्रहाचा शोध लागणे ही अत्यंत उत्साहवर्धक बाब आहे. हा ग्रह आकाराने पृथ्वीपेक्षा मोठा आहे. या ग्रहाभोवती एवढे दाट वातावरण दिसून आले आहे की, त्यावर पृथ्वीप्रमाणेच पाणी द्रवरूपात असण्याची शक्यता आहे. दुर्बिणीच्या मदतीने या ग्रहावर जीवनाच्या खाणाखुणा दिसतात का, हे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. ‘ट्रान्झिटिंग एक्सोप्लॅनेट सर्व्हे सॅटेलाइट’ (टीईएसएस) हा दुर्बीणरूपी उपग्रह ‘नासा’ने ग्रहांचा शोध घेण्यासाठी गेल्या वर्षी 18 एप्रिलला सोडला होता. तो आणखी दोन वर्षे कार्यरत राहणार आहे. स्पेनच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅस्ट्रोफिजिक्स ऑफ दी कॅनेरी आयलँड आणि युनिव्हर्सिटी ऑफ ला लागुना’च्या खगोलशास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, त्यांनी जीजे 357 सूर्यमालेचा शोध लावला आहे. या सूर्यमालेत एकंदर तीन ग्रह आहेत. त्यातील एका उपग्रहावर (जीजे 357 डी) जीवनास पोषक वातावरण असू शकते. याखेरीज या मालेत आणखी एक छोटा उपग्रह (जीजे 357) देखील आहे. तो सूर्याच्या आकारापेक्षा एकतृतीयांश आकाराचा असावा. यावर्षी फेब्रुवारीमध्ये टीईएस उपग्रहाने असा शोध लावला होता की, जीजे 357 हा ग्रह दर 3.9 दिवसांत थोडा-थोडा मंद होत चालला आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, या ग्रहाच्या आसपास आणखी एखादा ग्रह परिक्रमा करीत असल्याचे हे संकेत आहेत. ‘नासा’च्या ‘गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटर’च्या मते, हा परिक्रमा करणारा ग्रह ‘जीजे 358 डी’ असावा, जो आकाराने पृथ्वीपेक्षा सुमारे 22 टक्के मोठा आहे.

प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी आपल्या सूर्यमालेच्या बाहेर जीवन असावे का, याचा शोध घेण्याची आवश्यकता पूर्वीपासून सातत्याने व्यक्त केली होती. गणित आणि खगोल भौतिक विज्ञानात त्यांनी आयुष्यभर केलेल्या संशोधनात त्यांनी काही असे निष्कर्ष काढले होते, ज्यामुळे आपल्यापासून दूर असलेल्या सूर्यमालेत जीवनाचे अंश असण्याच्या शक्यतेकडे लक्ष वेधतात. दुसर्‍या ग्रहांवर जीवनाचे अंश असण्याच्या शक्यतेचा संबंध ते मानवजातीच्या अस्तित्वाशी जोडत असत. त्यांचे असे म्हणणे होते की, अवकाशातील विविध ग्रहांच्या धडकेमुळे किंवा अणुयुद्धामुळे आपले जीवन नष्ट होण्याचा धोका आहे. त्यामुळे मानवी संस्कृतीच्या जतनासाठी ब्रह्मांडात जीवनाच्या शक्यतांचा शोध घेणे आवश्यक आहे. जेणेकरून मानवजातीचे अस्तित्व सुरक्षित राहील. त्यासाठी त्यांनी रशियन अब्जाधीश यूरी मिल्नर यांच्या मदतीने दहा कोटी अमेरिकी डॉलर गुंतवणूक असणार्‍या एका दहा वर्षीय मोहिमेची सुरुवात केली होती. परग्रहांवर जीवनाचा शोध घेण्याच्या मोहिमांमधील ही सर्वांत मोठी मोहीम मानली जाते. या मोहिमेला ‘ब्रेकथ्रू मिशन’ असे नाव देण्यात आले होते. या मोहिमेत पृथ्वीपासून जवळ असलेल्या लाखो तार्‍यांकडून येणारे संकेत ऐकण्यात येत आहेत. या मोहिमेचे वैशिष्ट्य असे की, पूर्वी यासंदर्भात राबविलेल्या मोहिमांच्या तुलनेत या मोहिमेचा विस्तार तब्बल दहापट वाढविण्यात आला आहे. प्रा. हॉकिंग यांच्या या मोहिमेत पृथ्वीच्या आसपास असणार्‍या तार्‍यांच्या परिसरात जीवनाच्या शक्यतांचा शोध घेण्यासाठी रेडिओ लहरी अवकाशात पाठविण्यात आल्या आहेत.

या मोहिमेसाठी ‘ग्रीन बँक टेलिस्कोप’ आणि ‘पार्क्स टेलिस्कोप’ या जगातील सर्वात शक्तिशाली दोन रेडिओ दुर्बिणींची मदत घेतली जात आहे. याखेरीज एक तिसरी दुर्बीण अंतरिक्षातील संकेतांचा वेध घेईल. जगभरातील शास्त्रज्ञांच्या समूहाने 1960 पासूनच सामुदायिक प्रयत्नांच्या माध्यमातून ‘सर्च फॉर एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल इन्टेलिजन्स (सेटी)’ कार्यक्रमांतर्गत अंतरिक्षातील अन्य ग्रहांवर जीवनाच्या शक्यतांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. ‘प्रोजेक्ट ओज्मा’ या मोहिमेद्वारे 1960 मध्ये या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली होती. सुरुवातीच्या काळात या कार्यक्रमांतर्गत काही कालखंडासाठी रेडिओ टेलिस्कोपच्या माध्यमातून रेडिओ तरंग पाठविण्यात येत होते.

खगोल शास्त्रज्ञांच्या एका आंतरराष्ट्रीय गटाच्या म्हणण्यानुसार, ब्रह्मांडात अस्तित्वात असलेल्या आणि पृथ्वीशी मिळतीजुळती परिस्थिती असलेल्या काही ग्रहांवर माणूस पृथ्वीप्रमाणेच वास्तव्य करू शकतो. ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की, असे ग्रह मानवाला वास्तव्यायोग्य आहेत की नाहीत, हे शोधून काढणे हे खगोलशास्त्रातील एक मोठे यश ठरणार आहे. या गटाचे नेतृत्व करणारे चार्ली लाइनवीबर यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही वर्षांत असे अनेक ग्रह ब्रह्मांडात आढळले आहेत, जेथे जगण्यायोग्य परिस्थिती असू शकते. यातील काही ग्रहांवर पृथ्वीशी मिळतेजुळते वातावरण असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पृथ्वीपासून दूर जीवन व्यतीत करण्याच्या शक्यता वाढल्या आहेत. आता अशाच काही नव्या ग्रहांचा शोध लागल्यामुळे शास्त्रज्ञांचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळे अंतरिक्षात पृथ्वीप्रमाणेच जीवन असण्याची शक्यता असलेल्या ग्रहांच्या शोधमोहिमेस गती येणार आहे.